वीज बिल माफीसाठी आज राज्यभर वीज बिलाची होळी!

373

कोरोना महामारीच्या काळात घरगुती वीज ग्राहकांना वाढीव वीज बिले आली आहेत. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांची ३०० युनिटपर्यंतची वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी उद्या सोमवारी राज्यभर वीज बिलांची होळी केली जाणार आहे. महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेबरोबरच सर्व राजकीय पक्षांच्या वतीने हे आंदोलन केले जाणार आहे.

राज्यातील घरगुती ग्राहक गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनमुळे घरात आहेत. तसेच सर्वसामान्यांच्या हाताला काम नसल्याने आर्थिक चणचण जाणवत आहे. त्यातच गेल्या तीन महिन्यांचे एकत्रित बिल आल्याने ती कशी भरायची असा प्रश्न आहे. त्यामुळे ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या सर्व घरगुती ग्राहकांची वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालय, प्रांताधिकारी कार्यालय, तहसील आणि महावितरणच्या कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करून निवेदन दिले जाणार आहे. दरम्यान या आंदोलनात कोरोनाच्यादृष्टीने प्रशासनाने लागू केलेल्या सर्व नियमांचे पालन केले जाईल असे वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगडे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या