
सामना प्रतिनिधी। लातूर
रेणापूर तालुक्यातील बिटरगाव येथील अवैध दारुविक्री बंद करुन संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गावातील महिला व नागरिकांनी मंगळवारी दुपारी रास्तारोको आंदोलन केले. तहसीलदारांनी कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन देऊनही आंदोलनकर्ते आक्रमकच होते. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अटक करुन काही वेळाने सोडून दिले. यापूर्वीही या प्रकरणावर आंदोलन करण्यात आले होते पण अवैध दारु विक्री बंद झाली नाही.
रेणापूर तालुक्यातील बिटरगाव व परिसरात काही महिन्यांपासून अवैध दारुविक्रीचे प्रमाण वाढले आहे़ त्यामुळे गावात दररोज तंटे वाढले आहेत. मद्यपींची संख्या वाढल्याने गावातील महिला, मुली व नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी अवैध दारुविक्री तात्काळ बंद करावी, अशी मागणी १६ एप्रिल रोजी पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली होती़ दोन दिवसांच्या कालावधीत कुठलीही कारवाई न झाल्याने बिटरगावच्या महिला व नागरिकांनी १८ एप्रिल रोजी रेणापूर पोलीस ठाण्यावर पायी मोर्चा काढून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणा दिल्या होत्या. पोलीस ठाण्यात तब्बल तासभर ठिय्याही मांडला होता. तेव्हा नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षकांनी कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले होते़ त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात कुठलीही कार्यवाही न झाल्याने पुन्हा गावातील नागरिक आक्रमक झाले.
गाव व परिसरातील अवैध दारुविक्री बंद करावी, हातभट्टी दारुचे अड्डे उध्दवस्त करावेत, याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावे, अशा मागण्यांसाठी पिंपळफाटा येथे नागरिकांनी रास्तारोको आंदोलन केले. हे आंदोलन दयानंद सरवदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी भैय्यासाहेब सरवदे, कृष्णकांत वाघमारे, बालाजी सरवदे, शांताबाई सरवदे, सिंधूताई हानवते, मधुबाला सरवदे, रामकिशन हानवते, वसंत सरवदे, सुरेखा सरवदे, आशा वाघमारे, सुरेश वाघमारे, आम्रपाली सरवदे, सतीश हानवते, दत्ता उपाडे, पद्मीनबाई सरवदे आदी सहभागी झाले होते. पिंपळफाटा येथे हे आंदोलन करण्यात आल्याने दुपारी जवळपास पाऊणतास वाहतूक ठप्प झाली होती.





























































