
सामना प्रतिनिधी । लातूर
औसा तालूक्यातील समदर्गा येथील अवैध सावकारी करणाऱ्या सावकाराने जमिन बळकावली असून या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याच्या मागणीसाठी मागील ७ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काशिराम शहाजी काळे हे उपोषण करीत आहेत. मात्र प्रशासनास याकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, अवैध खाजगी सावकारी करणारे दगडू बाबू काळे, नागू बाबू काळे यांच्याकडून व्याजाने पैसे घेतलेले होते. व्याजासह रक्कम परत दिल्यानंतरही त्यांनी आपली जमिन परत केलेली नाही. माझ्यासोबत संबंधित सावकाराचा काय व्यवहार झाला याची सर्वप्रथम चौकशी करावी. अर्धा एकर जमिन शेतशेजारी किसन नामा काळे यांना विकून सावकाराचे पैसे फेडलेले आहेत ही सत्यता तपासण्यात यावी. समदर्गा, हळदुर्ग परिसरात संबंधिताची सावकारी अवैध आहे किंवा नाही याचीच चौकशी करावी अनेकांच्या जमिनी हडप केलेल्या असून गावातील योगेश आबा काळे याचीही जमिन हडपल्याची तक्रार आपल्या कार्यालयातच करण्यात आलेली आहे किंवा नाही याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली असून १८ जुलै पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण सुरु केले आहे. मात्र अजूनही उपोषणाची दखल घेऊन चौकशीची कारवाई करण्यात आलेली नाही असे काशीराम काळे यांनी सांगितले.
































































