भाजपच्या ‘रावणा’विरुद्ध राज्यात संताप! संताप!!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
protest-against-ram-kadam

सामना प्रतिनिधी । मुंबई

‘तुम्हाला मुलगी पसंत असेल तर तिला पळवून आणायला मदत करेन, कधीही फोन करा’ असे वादग्रस्त वक्तव्य करणाऱया भाजप आमदार राम कदम यांचा सर्व स्तरांतून जाहीर निषेध होत आहे. भाजपच्या या विकृत ‘राम’ला लोकांनी रावणाची उपमा दिली असून या रावणाविरुद्ध राज्यभरात ‘महाभारत’ पेटले आहे. कुठे राम कदम यांच्या पोस्टरला काळे फासले गेले तर कुठे चपलांचा हार घालून जोडे मारले गेले. काही ठिकाणी त्यांचा पुतळाही जाळला गेला. सोशल मीडियावरही कदम यांचा नेटकऱयांनी ‘हा राम नव्हे, मुली पळवणारा रावण’ असा उद्धार केला आहे.

वाचाळवीर राम कदमचे करायचे काय?
बीडमधील माजलगावमध्ये शिवसेनेच्या वतीने राम कदम यांच्या प्रतिमेस नवीन बसस्थानकासमोर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे माजी नगरसेवक धनंजय सोळंके यांच्या नेतृत्वाखाली जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘आमदार राम कदम यांना निलंबित करण्यात यावे, राम कदम यांचे करायचे काय?’ अशा विविध घोषणा देण्यात आल्या. या आंदोलनात रामराजे सोळंके, उपतालुकाप्रमुख अतुल उगले यांच्यासह शिवसैनिक तसेच युवासेना, विद्यार्थी सेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शिवसेनेचे जोडे मारा आंदोलन
राम कदम यांचे संरक्षण काढून घ्यावे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणी करत घाटकोपर पोलीस ठाण्यासमोर आज शिवसेनेने ठिय्या आंदोलन केले. शिवसेना विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वाखाली राम कदम यांच्या पोस्टरला जोडे मारा आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी कदम यांची व्हायरल झालेली क्लिप तपासून उद्या दुपारपर्यंत माहिती देतो असे आश्वासन दिले, मात्र कारवाई केली नाही तर पुन्हा दोन दिवसांनंतर जोरदार आंदोलन करू, असा इशारा शिवसैनिकांनी दिला.

घाटकोपरमध्ये पुतळा जाळला
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राम कदम यांच्या घाटकोपर येथील घरावर धडक मोर्चा नेला. कदम यांच्या घरासमोरच त्यांचा प्रतीकात्मक पुतळा त्यांनी भररस्त्यात जाळला. ‘आम्ही जिजाऊच्या लेकी, पळवून दाखवा, राम कदमांचा चौरंग करू,’ अशी घोषणाबाजीही यावेळी महिलांनी केली. कदम यांच्यावर गुन्हा दाखल न केल्यास उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला.

नेटकऱयांकडून कदम यांचा उद्धार
व्हॉटस्ऍप, ट्विटर, फेसबुकवर नेटकऱयांनी राम कदम यांचा उद्धार चालवला आहे. विविध टीव्ही मालिकांमधील लोकप्रिय संवादांचा तसेच चित्रांचा वापर त्यासाठी केला गेला आहे.

– ‘लागीर झालं जी’ या मालिकेतील भैयासाहेब राम कदमांना फोन करून सांगतो, ‘कदम साहेब…मला शीत्ली जाम आवडती…

– ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या हिंदी मालिकेतील जेठालाल सांगतो, ‘मुझे बबिता जी पसंत है..’

– डायपर घातलेला लहान मुलगा फोनवर एका मुलीला धमकावतोय…‘जर प्रपोजला नाय म्हटलीस तू…तर त्या आमदाराला सांगून तुला पळवून घरी आणेल बघ…’

– मुलगा – आय लव्ह यू , मुलगी – मला बॉयफ्रेंड आहे, मुलगा – (मोबाईल काढून) हॅलो राम कदम… मुलगी – (पटकन) आय लव्ह यू टू!

– ‘राम कदमांनी केली सुटका…ट्रोलर्सनी छळले होते. थँक्यू राम कदम.’ – अभिनेता सचिन पिळगावकर

– मला अंबानींची मुलगी आवडली आहे आणि आईवडिलांनाही ती पसंत आहे. पण सकाळपासून राम कदम फोन घेतच नाहीयेत. काय करू?
– एक तरुण

– भाजप म्हणते ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’. राम कदम म्हणतात ‘बेटी डराओ, बेटी उठाओ’

  • परिचारक – सैनिकांच्या पत्नींचा अपमान, दानवे – शेतकऱयांचा अपमान, छिंदम – शिवरायांचा अपमान, बनसोडे – महिलेसमोर गुप्तांग दाखवून गलिच्छ वक्तव्य करणारा, राम कदम – स्त्रीयांचा अपमान, मेहता – शहीदांच्या घरासमोर पार्टी करणारा. ही सगळी घाण ज्या चिखलातून उपजली त्याचे नाव ‘भाजप’
    – कल्याण बिराजदार

भाजपकडून राम कदम यांची पाठराखण,

भाजपचे आमदार राम कदम यांच्या विरोधात जनआंदोलन उसळले आहे, मात्र तरीही महिलांबाबत अशोभनीय वक्तव्य करणाऱया राम कदम यांनी अजूनही माफी मागितलेली नाही. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या मुंबईतील नेत्यांनी यावर मौन राखले आहे, तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी राम कदम यांच्या वक्तव्याची सीडी ऐकल्यावर निर्णय घेऊ असे सांगितले, पण कारवाईबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

राम कदम यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत ट्विटरवर फक्त खेद व्यक्त केला असला तरी पण अजूनही माफी मागितलेली नाही. त्यामुळे संपूर्ण राज्यात महिला संघटनांनी राम कदम यांच्या विरोधात जनआंदोलन पुकारले आहे. भाजपने राम कदम यांच्या वादग्रस्त वक्तव्याची सीडी मागवली आहे. दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राम कदम यांच्या वक्तव्याची सीडी ऐकल्यावर निर्णय घेऊ असे सांगितले.

स्त्रीला भोगवस्तू ठरवून एखाद्या वस्तूप्रमाणे तिला मनाविरुद्ध पळवून नेणाऱ्या नालायक लोकप्रतिनिधींना खाली खेचल्यावाचून इथल्या समस्त स्त्रिया व दलित पँथर गप्प राहणार नाही. नुसती माफीच नाही तर त्यांनी राजीनामाच द्यावा. जर नेते जाहीर सभेत असे बोलतात तर यांचे कार्यकर्ते तर बलात्कार करणारी मानसिकता ठेवतील, त्यांना वेळीच रोखले पाहिजे. शिवाजी महाराजांनी शत्रूच्या सुनेलाही मानपान देऊन परत पाठवली होती. हा स्त्रियांना सन्मान देणाऱ्या शिवरायांचा देश आहे. तिथे या विकृत रावणांना थारा नाही.
– मलिका नामदेव ढसाळ, दलित पँथर

राम कदम स्वतःला हरिभक्तपरायण म्हणतात, पण त्यांनी स्वतःला हभप म्हणवून घेऊ नये. बेताल वक्तव्ये करणाऱया कदमांना पाठीमागे आचारविचारांची बैठक नाही. गळ्यात माळ घातली म्हणून कोणी हभप होत नाही. ‘ज्यांनी मात्रा घ्यावी त्यांनी पथ्ये सांभाळावीत’ असे तुकाराम महाराज म्हणतात. ‘परस्त्री मातेसमान’ अशी संतांची शिकवण असताना यांनी मुलींचा बाजार मांडला. त्यामुळे त्यांनी स्वतःला वारकरी म्हणवून घेऊ नये. सरकारने त्यांना वारकऱयांच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या विश्वस्तपदावरून काढून टाकावे.
-ह.भ.प. रामेश्वर महाराज शास्त्री, महाराष्ट्रीय वारकरी मंडळ

‘प्रसारमाध्यमांवर जी राम कदम यांची क्लिप दाखवली जात आहे तसे वक्तव्य करणे चुकीचेच आहे. जर यामध्ये ते दोषी आढळले तर गृहखाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल.’
– विनोद तावडे, सांस्कृतिकमंत्री

‘राज्यात कुठे मुली पळवण्याचा प्रकार घडला तर पहिला गुन्हा राम कदम यांच्यावर दाखल करा.’
– जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस नेते

‘रामाचं नाव लावणाऱ्या रावणाचं दहन आपण कधी करणार?’
– चिन्मय मांडलेकर, अभिनेता

राम कदमांवर कारवाई न केल्यास विधानसभा चालू देणार नाही – काँग्रेस
भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलींबाबत केलेले विधान म्हणजे माता-भगिनींचा अपमान आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर विधानसभेचे आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला आहे. राम कदम यांच्यावर कारवाई होत नाही तोवर विधानसभेचे कामकाज न चालू देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. एकीकडे देशाचे पंतप्रधान ‘बेटी बचाओ’चा नारा देतात आणि त्यांचे आमदार मात्र ‘बेटी भगाओ’ची घोषणा करतात. हा प्रकार अत्यंत निषेधार्ह असून काँग्रेस पक्ष त्याचा तीव्र शब्दांत धिक्कार करीत असल्याचे विखे-पाटील म्हणाले.