
जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शुक्रवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर खालच्या स्तरावर टीका केली. दानवे यांच्या टीकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले असून त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. जालन्यातील गांधींचमन चौकात शनिवारी रावसाहेब दानवे यांचा निषेध करत त्यांचा पुतळा जाळण्यात आला.
यावेळी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. रावसाहेब दानवे यांची जनआशीर्वाद यात्रा बेताल वक्तव्य करण्यासाठी आहे का, असा सवाल काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. दानवे यांनी बेताल वक्तव्य करणं थांबवावे अन्यथा त्यांना राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसने दिला आहे. रावसाहेब दानवे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांवर बेताल टीका करत आहेत. त्यासाठीच जन आशीर्वाद यात्रा काढण्य़ात येत आहे का, दानवे यांना राहुल गांधी यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करण्यासाठीच पदोन्नती दिली आहे का, असा सवाल यावेळी काँग्रेसने उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या विरोधात अशाप्रकारे बेताल वक्तव्य करणाऱ्यांना यापुढे राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.



























































