रविवारी मध्यरात्रीपासून दूध दरवाढीसाठीच्या आंदोलनाला सुरूवात,आंदोलकांनी टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नगर 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीसाठी रविवारी मध्यरात्रीपासून पासून आंदोलनाचा इशारा दिला आहे. नगर जिल्हयातील सर्व नामांकित खाजगी दुध डेअरी चालकांनी या आंदोलनास पाठींबा दिला आहे. सरकारने २७ रुपये लिटरने शेतकर्‍यांकडून दूध खरेदी करावी, किंवा लिटरमागे ५ रुपये अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे या मागणीसाठी अनेक संघटनांनी पुढाकार घेतला आहे. पंढरपूरच्या विठोबाला आणि शिर्डीच्या साईबाबांना रात्री १२ वाजता दुग्धाभिषेक केल्यानंतर आंदोलनाची सुरवात होणार आहे.

दरम्यान दूध उत्पादकांचे आंदोलन सुरू झाल्यावर सरकारकडून गुजरात व कर्नाटकातून दूध मागवण्याचे प्रयत्न होतील. पण गुजरातचे दूध हार्दिक पटेल व कर्नाटकचे दूध तेथील रयतू परिषद महाराष्ट्राकडे येऊ देणार नसल्याचे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. नगर जिल्ह्यामध्ये खासगी दुध चालकांमध्ये प्रभात, एस.आर.थोरात, राजहंस, कृष्णाई आदींसह दुध संघचालकांनी या आंदोलनाला पाठींबा जाहीर केला असुन रविवारी मध्यरात्रीपासूनच दूध न देण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
दरम्यान सांगलीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी टँकर फोडून दूध रस्त्यावर सोडले आहे. वाळवा तालुक्यातील येवलेवाडी फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईला निघालेल्या दुधाच्या टँकरच्या काचा फोडून टँकरमधील दूध रस्त्यावर सोडले आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र दूध उत्पादकांच्या आंदोलनांमध्ये सहभागी होऊ नये यासाठी राज्यभर किसान सभेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांमार्फत नोटिसा बजावण्यात येत असून आंदोलन करण्यास प्रतिबंध करण्याचा प्रयत्न केला जात असल्यचा आरोप डॉ.अजित नवले यांनी केला आहे व पोलिसाच्या या कारवाईचा निषेधही त्यांनी केला.