
राजेंद्र वाडेकर । राहुरी
पिण्याच्या पाण्याबरोबरच इतर सुविधांपासून वंचित ठेवणाऱ्या राहुरी तालुक्यातील उंबरे ग्रामपंचायतीच्या सरपंच, सदस्य व ग्रामसेवकाला आदिवासी वसाहतीतील ग्रामस्थांनी तब्बल अडीच तास ग्रामपंचायतीत कोंडुन ठेवल्याने चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान प्रशासनाने ३ महिन्यात सुविधा पुरविण्यात येतील हे लेखी आश्वासन दिल्याने ग्रामपंचायतीचे टाळे काढण्यात आले.
उंबरे गावापासून २ किलोमिटर अंतरावर असलेल्या डागवस्ती येथील संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी सकाळी उंबरे बस स्थानका पासून हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायत कार्याल्याला टाळे ठोको आंदोलन छेडले. ग्रामस्थांच्या या आक्रमक पवित्रा पाहता ग्रामपंचायत पदाधिकारी, सदस्यांची भंबेरी उडाली. दीड हजार लोकवस्ती असलेले उंबरे ग्रामपंचायत हद्दीतील दीड हजार लोकवस्ती असलेला डागवस्ती हा वार्ड सोयीसुविधांपासून वंचित आहे. या कालावधीत वस्तीवरील पिण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगातून २ लाख २० हजार रुपये खर्चाची पाईप लाईन म्हणून मंजूर करण्यात आली होती. मात्र पाईप लाईनचे एक किलोमीटर पुढील काम बंद करण्यात आले. या कामाचा प्रत्यक्षात खर्च १ लाख रूपयांच्या आत असताना मात्र दुप्पट दाखविण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
घटनास्थळी गटविकास अधिकारी यांना बोलवा तो पर्यंत ग्रामपंचायत टाळे काढणार नाही हा पविञा आंदोलकांनी घेतल्याने घटनास्थळी वातावरण तणावपूर्ण बनले होते. अखेर ग्रामपंचायत प्रशासनाकडुन ३ महिन्यात सुविधा पुरविण्याचे लेखी आश्वासन मिळाल्याने ग्रामपंचायत टाळे काढुन अडीच तास कोंडलेल्या पदाधिकारी सदस्य व ग्रामसेवकाची सुटका करण्यात आली.






























































