
सामना प्रतिनिधी । मुंबई
मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि हक्कासाठी पहिल्यादांच मराठीसाठी कार्यरत असणाऱया 24 संस्था एकत्रित येऊन 24 जून रोजी आझाद मैदानावर एल्गार करणार आहेत. मराठी शाळांचे सक्षमीकरण, मराठी शिक्षण कायदा, प्राधिकरणाची स्थापना, मराठी भाषा भवन, ग्रंथालायचे सक्षमीकरण, मराठीचा अभिजात दर्जा आदी मागण्यांसाठी आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला जाणार आहे.
कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकाराने ‘मराठीच्या भल्यासाठी’ या व्यासपीठाची स्थापना नुकतीच करण्यात आली. याअंतर्गत कोमासापसह अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळ, महाराष्ट्र साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ, मुंबई मराठी साहित्य संघ, दक्षिण मराठी साहित्य परिषद, ग्रंथाली, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघटना अशा एकूण 24 संस्था एकत्रित आल्या आहेत. त्यांनी पत्रकार परिषद आज झाली. यावेळी सुकाणू समितीचे अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मानद उपाध्यक्ष मराठी अभ्यास केंद्राचे प्रमुख दीपक पवार उपस्थित होते.
– मराठी शिक्षण कायदा राज्य सरकारने आपला कार्यकाळ संपण्यापूर्वी लागू करावा, अशी मागणी माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली. इंग्रजीला आमचा विरोध नाही. मराठी शाळेची झालेली दुर्दशा सुधारण्यासाठी राज्य सरकारने मराठी सक्षमीकरणासाठी 100 टक्के अनुदान द्यावे. मराठीच्या सक्षमीकरणासाठी एक समिती नेमून त्यावर उपाययोजना सुचवण्यात याव्या. मराठी शाळेच्या गुणवत्ता सुधारावी. तसेच शाळेतील ग्रंथालये समृद्ध करावी, अशी मागणी लक्ष्मीकांत देशमुख यांनी केली.


























































