
महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना शाखा रत्नागिरीच्या वतीने रत्नागिरी महावितरण कार्यालयासमोर मंगळवारी धरणे आंदोलन छेडले गेले. विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर रत्नागिरीच्या देखील कार्यकारिणीने या आंदोलनाला पाठिंबा देत रत्नागिरी महावितरण कार्यालया समोर आंदोलन छेडले.
वीज कायदा दुरुस्ती विधेयक 2022 हे संविधान विरोधी, राज्याच्या हिताच्या विरोधात तसेच मागासवर्गीयांच्या घटनात्मक हक्कांच्या विरोधात असल्यामुळे त्यास महाराष्ट्र शासनातर्फे विरोध करण्यासाठी वीज कंपन्यांनी प्रस्ताव पाठवावा, नवी मुंबई व इतर तीन जिल्हे अडाणी कंपनीला देण्यासाठी केंद्र सरकारने काढलेले अन्यायकारक नोटिफिकेशन त्वरित रद्द करण्यासाठी महावितरणने राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, गट विमा योजनेचा कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार वीज कर्मचाऱ्यांवर न लादता सदर योजनेअंतर्गत कॅशलेस वैद्यकीय सेवेचे फायदे तिन्ही कंपन्यांनी स्वतःच्या महसुलातून देण्याची कार्यवाही करावी, तिन्ही वीज कंपन्या मधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांची विनंती बदलीची सर्व प्रलंबित प्रकरणे निकालात करण्यात यावीत, महावितरण मध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया राबवताना विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक, लेखा सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक ही पदे कंत्राटी पद्धतीने न भरता स्थायी स्वरूपात भरण्यात यावीत अशा अनेक मागण्यांच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन मंगळवारी छेडण्यात आले.
यावेळी परिमंडळ सचिव संजय तांबे, सिंधुदुर्ग रत्नागिरी परिमंडळाचे अध्यक्ष निलेश आंबेकर, सिंधुदुर्ग मंडळाचे अध्यक्ष सुनील गोसावी, रत्नागिरी मंडळाचे सचिव अनंत सावर्डेकर, विभागीय अध्यक्ष रत्नागिरीचे मिलिंद कांबळे, रत्नागिरी विभागीय सचिव योगेश पडवळ, कणकवली विभाग अध्यक्ष विनोद चव्हाण, कुडाळ विभाग अध्यक्ष अमित मेस्त्री, कोषाध्यक्ष सुनील शिरोडकर, परिमंडळ संघटक मनोज माने, राजेंद्र जाधव, प्रकाश सावंत आदी उपस्थित होते.

























































