
भाजपचे किरीट सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याविरोधात मंगळवारी मालेगावात महापौर, उपमहापौरांसह नगरसेविकांनी निदर्शने केली, सोमय्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मालेगावात कोणीही बांगलादेशी, रोहिंगे नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे, असे महापौर नसरीन शेख, उपमहापौर शान-ए-हिंद यांनी स्पष्ट केले.
सोमय्या मंगळवारी मालेगाव दौऱ्यावर गेले होते. तेथे महापौर नसरीन शेख, उपमहापौर शान-ए-हिंद यांच्यासह नगरसेविकांनी निदर्शने केली. कार्यकर्त्यांनी मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला. सोमय्या हे मालेगावला बदनाम करीत आहेत, त्यांनी हे थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. येथे कोणीही बांगलादेशी रोहिंगे नाहीत, हे एसआयटी चौकशीत निष्पन्न झाले आहे. महापालिकेच्या महासभेत महापौरांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे, ते काम सुरू आहे, असेही आंदोलक महिलांनी स्पष्ट केले. कोणीही येऊन मालेगावची बदनामी करीत असेल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला.






























































