स्वतःच्या डोक्यात कोयत्याने वार करून मनोरुग्णाची आत्महत्या

484
file photo

बीड जिल्ह्यात केज तालुक्यातील आडस येथील आठवडी बाजारात भर दुपारी एका मनोरुग्णाने हातात कोयता घेऊन दहशत माजवली. त्यानंतर त्याने स्वतःच्याच डोक्यात कोयत्याने वार केले. पोलिसांनी गंभीर जखमी अवस्थेत त्याला स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. शेकडो लोकांच्या समोर घडलेल्या आत्महत्येच्या अघोरी घटनेने आडसच्या आठवडी बाजारात एकच खळबळ उडाली होती.

विलास लक्ष्मण गायकवाड (वय 43, रा. आडस, ता. केज) असे त्या मनोरुग्णाचे नाव आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे तो सर्वत्र फिरत असे. गुरुवारी आडसचा आठवडी बाजार असतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विलास दुपारी 3 वाजताच्या सुमारास बाजारात आला होता. यावेळी आठवडी बाजार आणि जवळच एका मंदिरात सप्ताह सुरू असल्यामुळे प्रचंड गर्दी झालेली होती. कुठल्यातरी कारणावरून विलास त्याच्या वडिलांवर चिडलेला होता. त्यामुळे त्याने बाजारातील एका दुकानात विक्रीसाठी ठेवलेला कोयता उचलला आणि वडिलांवर उगारून त्यांचा पाठलाग सुरू केला. वडिलांनी कसाबसा जीव वाचवत गर्दीचा फायदा घेत तिथून पळ काढला. त्यानंतर संतप्त झालेल्या विलासने लोकांच्या अंगावर धावून जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारात दहशत निर्माण झाली होती. त्यानंतर त्याने स्वतःचे कपडेही फाडले. जो कोणी समजूत घालण्यासाठी जवळ येईल त्याच्यावर विलास धावून जावू लागल्यामुळे त्याला आवरणे अवघड झाले.

याची खबर पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. परंतु, विलास पोलिसांनाही जुमानेनासा झाला. अखेर त्याने हातातील कोयत्याने स्वतःच्याच डोक्यात अनेक वार करून घेत स्वतःला गंभीर जखमी केले. वार खोलवर गेल्याने त्याचा मेंदू उघडा पडला होता, परंतु तशाही अवस्थेत त्याने लोकांना भीती घालणे चालूच ठेवले. अखेर पोलिसांनी इतर काही लोकांच्या मदतीने विलासचे हातपाय बांधले आणि रुग्णवाहिकेतून त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले. तिथे सायंकाळी ७ वाजता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विलासचे वडील किंवा कुटुंबातील इतर कोणीही सदस्य रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात आले नसल्यामुळे अधिक माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसात नोंद झालेली नव्हती. आठवडी बाजारात भरदुपारी विलासने अघोरी पद्धतीने आत्महत्या केल्याने शेकडो लोकांचा थरकाप उडाला होता.

यापूर्वीही स्वतःला केले होते जखमी
दरम्यान, विलासने यापूर्वीही काही वेळेस स्वतःला गंभीर जखमी करून घेतले होते असे समजते. एकदा तर त्याने दगडाने स्वतःची बोटे ठेचून घेतली होती अशी माहिती काही ग्रामस्थांनी दिली. तर, स्वतःच्या पत्नीवरही त्याने वार केले होते, अशी ग्रामस्थात चर्चा आहे.

आपली प्रतिक्रिया द्या