
सामना ऑनलाईन । मुंबई
क्रॉफर्ड मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाऱ्या महिलांचा पाठलाग करून त्यांचे मोबाईलमध्ये चोरून फोटो काढणाऱ्या एका विकृत तरुणाला एल. टी. मार्ग पोलिसांनी पकडले. सनातन सुनील धर्माधिकारी (29) असे त्याचे नाव आहे.
काळाबादेवी येथे राहणारी 21 वर्षीय तरुणी खरेदीसाठी आई व बहिणीसोबत सोमवारी सायंकाळी क्रॉफर्ड मार्केट येथे गेली होती. खरेदी झाल्यानंतर ती टॅक्सीची वाट बघत उभी असताना एक तरुण त्याच्या मोबाईलमध्ये तिचे फोटो काढताना दिसला. त्यामुळे तिने जवळ जाऊन त्या तरुणाकडे मोबाईल मागितला असता त्याने तेथून पळ काढला तेव्हा सदर तरुणीने आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले. त्याला पकडल्यानंतर नागरिकांनी त्याला बेदम मारहाण केली. तेवढय़ात घटनास्थळी पोलीस आल्यानंतर त्यांनी शिवडी येथे राहणाऱ्या सनातन धर्माधिकारीला आपल्या ताब्यात घेतले. पोलिसांनी धर्माधिकारीचा मोबाईल घेऊन फोटो गॅलरीतले फोटो तपासले असता त्या तरुणीचे धर्माधिकारी याने गुपचूप काढलेले सात फोटो आढळले. एल. टी. मार्ग पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला, मात्र नागरिकांच्या मारहाणीत जखमी झाल्याने धर्माधिकारीला जी. टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अन्य महिलांचेही फोटो
पोलिसांनी धर्माधिकारी याच्या मोबाईलमधील फोटो गॅलरी पाहिली असता त्यात अन्य महिलांचेदेखील चालताना, गॅलरी तसेच खिडकीवर उभ्या असतानाचे अनेक फोटो आढळले. धर्माधिकारीने अनेक महिलांचे गुपचूप फोटो काढले आहेत. त्यामुळे त्याच्या विरोधात आणखी कुठल्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का याचा तपास पोलीस करीत असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

























































