मोहटा देवस्थानात शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पाथर्डी

तालुक्यातील क्षेत्र मोहटा देवस्थानात पारंपरिक पद्धतीने देवीच्या जयघोषात शारदीय नवरात्रौत्सवास प्रारंभ झाला असून बुधवारी भक्तीमय वातावरणात घटस्थापना करण्यात आली. यावेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे व त्यांच्या पत्नी अस्मिता भिल्लारे यांचे हस्ते मुख्य धार्मिक विधी संपन्न झाला. मोहटे गावात विश्वस्तांच्या हस्ते महाआरती केल्यानंतर सुवर्ण अलंकाराने सजवलेल्या देवीच्या मुखवट्याची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. रेणुका विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे लेझीम पथक,टिपऱ्या पथक सहभागी झाले होते.

यावेळी सप्तशती पाठ व वेद मंत्रोच्चाराने संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. नगर,शेवगाव, बीड, आष्टी येथून येणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलले होते. याप्रसंगी विविध गावातील भाविकांनी मोफत चहापाणी व फराळाची व्यवस्था केली. देवस्थान समितीतर्फे भाविकांसाठी आवश्यक सुविधा पुरविण्यात आल्या असून परिसरात, दर्शन रांगेत व गाभाऱ्यात सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. सुंदर विद्युत रोषणाईमुळे मंदिराची आकर्षकता आणखी वाढली आहे. परिवहन मंडळाच्या बीड,नगर,औरंगाबाद, पुणे विभागातून जादा गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. देवस्थान समितीच्या पाथर्डी-मोहटा-पाथर्डी या मार्गावर अहोरात्र गाड्या सुरू ठेवण्यात येणार असून पोलिसांचा पुरेसा बंदोबस्त तैनात केला आहे.

devi-2

आगामी पंधरा दिवस संपूर्ण तालुका नवरात्रमय होणार असून कोजागिरी पौर्णिमेला सांगता होईल. नवसाची पूर्ती म्हणून घटी बसणाऱ्या अनेक महिला राज्याच्या विविध भागांतून दाखल झाल्या आहेत. आरतीसाठी दर्शनबारी व मुख्य मांडवात एल इ डी टीव्ही द्वारे थेट गाभाऱ्याचे दर्शन व आरतीचे प्रक्षेपण करावे अशी मागणी भाविकांनी केली आहे. मोहटे गावात रेणुका विद्यालयाचे विद्यर्थ्यांचे लेझीम व दांडिया पथक,श्री त्रिलोक जैन विद्यालयाचे बँड पथक,स्वामी विवेकानंद विद्यालयाचे स्केटिंग पथक आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. चालू वर्षी तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असल्याने देवस्थान समिती ने मोहटे गावातील पाऊतका येथे एक लाख लिटर पाण्याचे शेततळे करून त्या मध्ये टँकर द्वारे पाणी टाकून गडावर पाणी पोहचवले जाते.