बीएसएनएलचा मंजूर टॉवर अचानक नामंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मालवण

रेवंडी गावात मोबाईल रेंज नसल्याने बीएसएनएल टॉवरसाठी गेले वर्षभर सतत पाठपुरावा सुरू होता. भद्रकाली देवस्थान ट्रस्टनेही टॉवर उभारणीसाठी जागाही उपलब्ध करून दिली. टॉवर मंजूर झाला असल्याचे अधिकाऱ्यांनीही स्पष्ट केले. मात्र मंजूर टॉवर यादीत रेवंडी येथील टॉवरचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थ संतप्त बनले. मालवण बीएसएनएल कार्यालयावर धडक देत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत जाब विचारला.

दरम्यान, टॉवरचे काम दोन दिवसात सुरू न केल्यास १५ ऑगस्टला उपोषणास बसण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. बीएसएनएलच्या असुविधाबाबत आणि मंजूर झालेले टॉवर नव्या यादीतून वगळण्यात आल्याने रेवंडी, मठबुद्रुक, निरोम येथील ग्रामस्थांनी बुधवारी बीएसएनएल कार्यालयाला धडक दिली. मंजूर टॉवर रद्द झाल्याचे समजताच ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

यावेळी सोनाली कोदे, अशोक सावंत, राजू परुळेकर, बाबा परब, रेवंडी सरपंच प्रिया कांबळी, देवस्थान अध्यक्ष युवराज कांबळी, विजय कांबळी, श्यामसुंदर तळाशीलकर, सचिन मोर्वेकर, जान्हवी कांबळी, प्राजक्ता चेंदवणकर, कृतिका कांबळी, अविनाश राऊत, प्रसाद परुळेकर, सागर बिरमोळे, उमेश सामंत आदी उपस्थित होते.

सोनाली कोदे म्हणाल्या, मालवण पंचायत समितीच्या सभागृहात नोव्हेंबर २०१७ पासून पाठपुरावा करत आहे. गावात टॉवरची आवश्यकता असल्याने भद्रकाली देवस्थानने जागा उपलब्ध करून दिली. याबाबत आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाली असताना शेवटच्या टप्प्यात मंजूर झालेला टॉवर नव्या यादीतून वगळण्यात आला. बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांनी सभागृहात रेवंडी तेथील टॉवर कार्यान्वित करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. मात्र अचानक टॉवर रद्द करण्यात आल्याने पंचायत समितीच्या सभागृहाचा अधिकाऱ्यांनी अपमान केला आहे, असाही आरोप कोदे यांनी केला.

यावेळी ग्रामस्थांनीही आक्रमक पवित्रा घेत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर घेतले. आमच्या गावातील मंजूर टॉवर अंतिम टप्प्यात रद्द करण्यात आला. अधिकारी कोणाच्या दबावाखाली असे काम करत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर देऊ. ग्रामस्थांचे टॉवर उभारणीसाठी पूर्ण सहकार्य असताना कार्यवाही होत नसल्याने आम्ही आता शांत बसणार नाही. आमचा मंजूर टॉवर आम्हाला मिळालाच पाहिजे, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली.