
सामना ऑनलाईन,नवी दिल्ली
तुम्ही नव्या शहरात आहात आणि तुम्हाला एर्मजन्सी आली, अशा वेळी जवळपास कुठले टॉयलेट आहे याचा शोध घेणे आता अधिक सोपे होणार आहे. ट्रेन आणि बसमधील गर्दीची माहिती देणारे फीचर लाँच केल्यानंतर आता गुगल मॅप्सवर सार्वजनिक शौचालय कुठे आहे याचीही माहिती मिळणार आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत गुगलने 45 हजार कम्युनिटी आणि सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर ऍड केली आहेत.
देशभरातील 1700 शहरांमधील सार्वजनिक शौचालये गुगल मॅप्सवर मार्क केली आहेत. मॅप्स ऍपवर ‘पब्लिक टॉयलेटस् नीयर मी’ या नावाने हे फीचर असेल. दररोज प्रवास करणाऱ्यांसाठी गुगलने आणखी एक नवीन फीचर आणले आहे. यूजर्सना बाईक-शेअरिंग स्टेशनची माहिती दिली जाणार आहे. हे फीचर आयओएस आणि ऍण्ड्रॉईड अशा दोन्ही डिक्हाईसकर उपलब्ध असेल.
बाईक शेअरिंग स्टेशनची माहिती मिळणार
गुगल मॅप्स फीचरच्या मदतीने बाईक उपलब्ध आहेत की नाहीत याची माहिती यूजर्सना मिळू शकेल. यासाठी गुगलने आयटीओ वर्ल्डसोबत पार्टनरशिप केली आहे, असे कंपनीने सांगितले आहे. या फीचरची गेल्या वर्षी न्यूयॉर्कमध्ये चाचणी घेतली होती. याआधी गुगलने हिंदुस्थानात मॅप्सवर रिडिझाईन एक्सप्लोअर टॅब, फॉर यू एक्सपिरिअन्स आणि डायनिंग ऑफर्स हे तीन नवीन फीचर लाँच केले होते. त्यामुळे जवळची हॉटेल, रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, एटीएम, शॉपिंग सेंटर आणि केमिस्टची माहिती मिळते.























































