
लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार पुन्हा सत्तेत येईल असे वाटत नव्हते; पण पुलवामा हल्ला झाला आणि त्याची प्रतिक्रिया उमटली. आता होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आणखी पुलवामा झाला नाही, तर सत्तापरिवर्तन होईल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या वेळी त्यांनी देशाच्या घसरत चाललेल्या अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. सरकारने परकीय गुंतवणूक आणि निर्यात वाढीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यकर्ता मेळाव्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार संभाजीनगरागत आले होते. आपण राज्यात अनेक भागांत दौरा केला. या वेळी आपल्याला बदल दिसतोय. शेतकरी आणि तरुण पिढीतील लोक सत्तांतर करतील असे चित्र आहे, असा दावा करताना शरद पवार यांनी आणखी एक पुलवामा न झाल्यास राज्यात सत्तांतर होईल, असे मत व्यक्त केले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी यांचे सरकार पुन्हा सत्तेत येईल, असे वाटत नव्हते. मात्र पुलवामा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधानांनी आक्रमक पद्धतीने आम्ही शेजारच्या देशाला धडा शिकवला आणि शिकवू शकतो याची जी मांडणी केल्याने चित्र बदलले.
देशात आलेल्या अर्थिक मंदीमुळे अर्थव्यवस्था संकटात आली आहे. अर्थ मंत्री दरदिवशी नवनवीन विधान करीत असल्याने अर्थव्यवस्थेचा खेळ केला जात आहे. उतरती कळा लागलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी सरकारने गुंतवणूक, निर्यात वाढवण्यासाठी पावले उचलली पाहिजेत; पण तसे होताना दिसत नाही, असे सांगत पवारांनी चिंता व्यक्त केली.
























































