मोठी बातमी – पुलवामा हल्लेखोरांना आसरा देणाऱ्या जैशच्या दहशतवाद्याला अटक

जम्मू-कश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास आयोगाला (एनआयए) मोठे यश मिळाले आहे. एनआयएने शुक्रवारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा सदस्य दहशतवादी शाकिर बरीश मागरे याला अटक केली आहे. शाकिर हा जैशचा ओव्हरग्राऊंड वर्कर असून त्याने पुलवामा हल्ला करणाऱ्या दहशतवादी आदिल अहमद डार याला आपल्या घरामध्ये आसरा दिला होता. हल्ल्यानंतर तब्बल वर्षभराने तो एनआयएच्या जाळ्यात सापडला आहे.

शाकिर पुलवामा हल्ल्यामध्ये सहभागी होता, असे एनआयएने स्पष्ट केले आहे. त्याने आदिल अहमद डार याला आसरा देण्यासह हल्ल्यासाठी आवश्यक सामग्रीही पुरवली होती. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून या हल्ल्याचा मास्टरमाईंड कोण आहे? आणि हल्लेखोराला मदत कोणी केली? याचा एनआयए शोध घेत होती. एनआयएकडे मुख्य आरोपीविरोधात काही ठोस माहिती नव्हती, मात्र आता शाकिरला अटक करण्यात आल्याने मोठा खुलासा होण्याची शक्यता आहे. तसेच त्याच्याकडून महत्त्वाची माहिती आणि नावेही उघड होण्याची शक्यता आहे.

एनआयएने अटक केलेल्या दहशतवाद्याने आदिल अहमद दार आणि पाकिस्तानी दहशतवादी मोहम्मद उमर फारूक याला 2018 मध्ये आपल्या घरात आसरा दिला होता. फेब्रुवारीमध्ये पुलवामा हल्ला केल्यानंतर हे दोघेही दहशतवादी शाकिर याच्या घरी थांबले होते. आयईडी बॉम्ब बनवण्यास त्याने दोघांची मदत केली होती, अशी माहिती दहशतवादी शाकिर याने चौकशीमध्ये दिल्याचे एनआयएने सांगितले. दरम्यान, पुढील चौकशीसाठी त्याला 15 दिवसांसाठी कोठडी ठोठावण्यात आली आहे.

14 फेब्रुवारी, 2019 ला पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे 40 जवान हुतात्मा झाले होते. यावेळी झालेल्या चकमकीमध्ये पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. या हल्ल्यामागे हे पाच दहशतवादी असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. परंतु या हल्ल्यानंतरही अनेक प्रश्न अनुत्तरित होते. एवढ्या मोठ्या हल्ल्यानंतरही एनआयएला आतापर्यंत चार्जशीट दाखल करता आली नव्हती.

आपली प्रतिक्रिया द्या