
महापालिकेकडून टीडीआर हक्क मिळणार असल्याचे भासवून तो विक्रीच्या आमिषाने व्यावसायिकाची तब्बल एक कोटींची फसवणूक करणाऱ्याला खडक पोलिसांनी अटक केली. विजय आबासाहेब घोरपडे (रा.धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. मागील चार वर्षांपासून तो फरार होता.
फिर्यादीचा टिंबर मार्केटमध्ये ट्रेडिंगचा व्यवसाय आहे. विजयने 2015 ते 2017 कालावधीत धायरीतील जागेबाबत महापालिकेच्या प्लॅनमध्ये डीपी रोडचे रिझर्वेशनमध्ये त्यांना दाखविले. त्याबदल्यात 910.32 चौरस मीटरचा टिडीआर मिळेल असे सांगीतले. त्यानुसार फिर्यादींनी टिडीआर विकत घेण्याचे ठरविले. त्यांनी विजयला एक कोटी रूपये देउन जानेवारी 2015 मध्ये करारनामा केला. मात्र, आरोपीने मिळकत खाजगी बँकेकडे गहाण ठेउन तीन कोटींचे कर्ज घेतल्याचे फिर्यादींना समजले. गुन्ह्यात विजय घोरपडे यांच्यासह गौरी आणि सिद्धार्थ यांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन घेतला होता.
विजय हे चार वर्षांपासून फरार होते. त्याच्या नातेवाईकांच्या घरी आल्याची माहिती खडक पोलिसांना मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट पोलीस निरीक्षक राजेंद्र तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी राहुल खंडाळे, राकेश जाधव, तळेकर, मोरे, घाडगे यांनी धनकवडीतून त्यांना ताब्यात घेतले. ही कामगिरी उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, एसीपी सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.



























































