पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर शुकशुकाट, विनाकारण फिरणाऱ्य़ांना पोलिसांकडून चाप

संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आता पोलिसांनी कडक तपासणी सुरू केल्याने विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्य़ांवर चांगलाच चाप बसला आहे. काल पहिल्या दिवशीच्या तुलनेत आज दुसऱ्य़ा दिवशी वर्दळ कमी झाली होती. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरही वाहतूक कमी झाल्याने सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता.

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्य़ा लाटेचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत दोन दिवसांचा ‘वीकेण्ड लॉकडाऊन’ झाल्यानंतर राज्यात बुधवारी रात्री आठनंतर येत्या 1 मेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण फिरणाऱ्य़ांवर कडक कारवाई करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यासाठी जिल्ह्यात सर्व प्रमुख चौकांसह मुख्य मार्गांवर अडीच हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपासूनच जिल्ह्यात संचारबंदीची अंमलबजावणी सुरू झाली.

काल पहिल्या दिवशी अत्यावश्यक व सार्वजनिक सेवा वगळता, सर्व दैनंदिन व्यवहार आणि वर्दळ ठप्प झाली. कोल्हापूरकरांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत घरातच राहणे पसंत केल्याचे चित्र होते. तरीही काही ठिकाणी पोलिसांनी दिलेल्या शिथिलतेमुळे नागरिकांची वर्दळ वाढल्याचे दिसून येत होते. आज मात्र पोलिसांनी बॅरिकेड्सद्वारे नाकाबंदी करून प्रत्येक वाहनाची तपासणी, तसेच वाहनधारकांकडे चौकशी सुरू केली. त्यामुळे कालच्यापेक्षा आज वर्दळ कमी झाली होती.

दरम्यान, राज्य शासनाच्या सूचनेनुसार आजही अत्यावश्यक आणि सार्वजनिक सेवा सुरूच राहिल्या. अत्यावश्यक सेवांतील कर्मचाऱ्य़ांसाठी एसटी आणि केएमटी बस अशी मोजकीच सार्वजनिक वाहने सुरू राहिली. मध्यवर्ती बस स्थानक परिसरात नागरिकांची अत्यंत तुरळक वर्दळ पाहावयास मिळाली.

सोलापुरात 429 जणांवर कारवाई

सोलापूर  शहरात संचारबंदीच्या दुसऱ्य़ा दिवशी पोलिसांनी अनावश्यक फिरणाऱ्य़ा 429 जणांवर कारवाई करीत सुमारे दीड लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यात 10 वाहने जप्त करण्यात आली आहेत. सोलापूर शहरात सध्या संचारबंदी सुरू असताना, काहीजण अनावश्यकरीत्या फिरत असल्याचे आढळले. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी असून, प्रमुख चौकांत पोलिसांची गस्त आहे. विनामास्क फिरणारे, दुचाकी, रिक्षा, ट्रॉली व डबलसीट फिरणाऱ्य़ांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. यात काही दुकानदारही आहेत. 10 वाहने जप्त केली असून, एक लाख 50 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या