
दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोतून अवैधरित्या बिअरची वाहतूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांनी काल रात्री कात्रज परिसरात टेम्पोतील 29 हजार रुपयांचे बियरचे 12 बॉक्स पकडले आहे. याप्रकरणी चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशासह राज्यभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थपना बंद केल्या आहेत. अत्यावश्यक सेवा देताना दूध, भाजीपाला, किराणा वस्तू आणि मेडिकल सेवा सुरू असून त्यांना पोलिसांकडून पासेस देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त वाहनांची तपासणी करण्यासाठी ठिकठिकाणी पोलीस गस्त घालत आहेत. शहरांतर्गत पोलिसांकडून रात्र गस्त वाढविण्यात आली आहे. काल रात्री भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कात्रज घाट परीसरात गस्त घालत होते. त्यावेळी पोलीस हवालदार पारखी, तोंडे यांच्यासह पोलीस नाईक भिंगारे यांना एक दुधाचा टेम्पो संशयास्पद फिरत असल्याचे दिसून आले त्यामुळे पोलिसांनी त्याला थांबविले. त्यानंतर दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पो चालकाकडे चौकशी केली असता तो खोट बोलत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे पोलिसांनी टेम्पोची झडती घेतली असता त्यामध्ये दुधाच्या कॅरेटच्या पाठीमागे ठेवलेले 29 हजार रुपयांचे 12 बिअर बॉक्स मिळून आले. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालकाला ताब्यात घेतले. टेम्पो जप्त करून भारती विद्यापीठ पोलिसांकडे देण्यात आला आहे.




























































