
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतुक नियम मोडणाऱ्या 27 खासगी वाहनांवर उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाने तपासणी मोहीम राबवत दोषी वाहनांवर कारवाई केली. ही कारवाई 15 दिवस सुरू राहणार आहे.
गेल्या काही दिवसांत महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेकदा वाहनचालक मद्यपान, मोबाईलवर बोलत वाहने चालविताना आढळून आले. या प्रकाराला आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने विशेष मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई केली. यावेळी पार्सल वाहतूक, विनापरवाना अथवा परवान्यांच्या अटींचा भंग करून वाहने चालविणे, कर, योग्यता प्रमाणपत्र, जादा भाडे आकारणे, टप्पा वाहतूक, खासगी बसमधून अवैधपणे प्रवासी वाहतूक करणे, अवैध माल वाहतूक करणे, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, मद्यपान करून वाहने चालविणे यांसह वाहन कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. दिवाळीच्या पाश्र्वभूमीवर राज्यभरात विविध ठिकाणी जाताना अनधिकृत बस नियम धाब्यावर बसवून वाहतूक करत असल्याने ही कारवाई महामार्गावर सुरू आहे.
या कारवाईत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण व सहायक मोटार वाहन निरीक्षक संदीप म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार वाहन निरीक्षक मारुती पाटील, संजय कांबळे, दिग्विजय जाधव आदी सहभागी झाले होते.



























































