
मोबाइल चोरीचा असल्याचा फोन राजगड पोलिसांनी केल्याची माहिती देण्यासाठी ओळखीच्या तरुणाच्या घरी गेल्याचा राग आल्यामुळे दोघांनी तरुणावर चाकूहल्ला करुन गंभीर जखमी केले आहे. त्याशिवाय परिसरात दहशत परवित गोंधळ घातला. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केले. ही घटना तीन दिवसांपुर्वी रात्री नउच्या सुमारास बिबवेवाडीतील न्यू बालाजी ट्रेडर्स दुकानाजवळ घडली.
सौरभ राजू भगत (वय 21, रा. मोरे वस्ती, सहकारनगर ) आणि अजय जवाहर प्रजापती (वय 20, सुखसागरनगर, कोंढवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सूरज कामथे (वय 29, रा. धनकवडी ) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज रिक्षाचालक असून आरोपी सौरभ व अजय एकमेकांच्या ओळखीचे आहेत. काही दिवसांपुर्वी सूरजने सौरभला त्याचे सीमकार्ड दिले होते. सौरभने एक दिवस सीमकार्ड वापरून पुन्हा सूरजला दिले. त्यानंतर राजगड पोलिसांनी सूरजला फोन करुन सीम कार्ड टाकलेला मोबाईल चोरीचा असल्याची माहिती दिली. तो मोबाइल पोलिस ठाण्यात जमा करण्याचे सांगितले. त्यामुळे ही माहिती सांगण्यासाठी सूरज सौरभच्या घरी गेला. त्याचा राग आल्यामुळे सौरभ आणि अजयने सूरजवर चाकूहल्ला केला. त्याच्यावर वार करुन गंभीर जखमी केले. त्याशिवाय हातात चाकू घेउन परिसरात दहशत माजविली. त्यामुळे दुकानदारांनी दुकाने बंद करुन पळ काढला. याप्रकरणी तपास सुरु असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किरण पावसे यांनी दिली.


























































