कधी पैशांचा पाऊस, तर पुत्रप्राप्तीची भानामती, पुण्यात अंधश्रद्धेतून होणाऱ्या घटनांचे सत्र

black-magic

नवनाथ शिंदे

नागरिकांच्या मनातील सुप्त इच्छा पुर्ण होण्यासाठी अनेकजण कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यासाठी विशेषतः मांत्रिक, भानामती, जादूटोणाद्वारे भोंदूगिरीला खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे राज्यात अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा होउनही दिवसेंदिवस भोंदूगिरीचा भुलभुलैय्या वाढत चालला असल्याचे घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये अशिक्षितापासून ते सुरक्षितापर्यंत मोहजाळ्यात गुरफटल्याचे दिसून आले आहे. कधी पैशांचा पाउस तर कधी पुत्रप्राप्ती, भूत-प्रेत घालविण्यासाठी नागरिक भोंदू मांत्रिकाच्या नादी लागून नुकसान करून घेत आहेत. पुण्यात मागील काही दिवसांत अशाच काही घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

जादूटोणा करून व्यावसायिकाला पैशांचा पाऊस पाडून दाखवितो, असे सांगत वेळोवेळी तब्बल 52 लाखांचा गंडा घालणाऱ्या भोंदू मांत्रिकाला पुणे पोलिसांनी नुकतेच अटक केले आहे. किसन आसाराम पवार असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्यामुळे पैशांच्या मोहापायी पुण्यातील व्यावसायिक मांत्रिकाच्या नादी लागून डुबला आहे. कंपनीद्वारे करोडो रूपयांची उलाढाल करणाऱ्या व्यावसायिकाला कष्टाऐवजी पैशांचा पाउस महत्वाचा वाटला. त्यामुळे मांत्रिकाने दिलेले आश्वासन पैशासह हवेतच विरले आहे. पैशांच्या पावसासाठी विविध प्रकारच्या पूजा-अर्चा करण्यासाठी रक्कम ठेवावी लागणार असल्याचे सांगत मांत्रिकाने व्यावसायिकाला जाळ्यात अडकविले होते. तब्बल 52 लाख रुपये देउनही पैशांचा पाऊस पडला नसल्यामुळे व्यावसायिकाने पैसे देणे बंद केले. त्यानंतर आणखी पैसे लुटण्याच्या हेतूने मांत्रिकाने व्यावसायिकाला तुमचे काम झाले आहे. फक्त शेवटचा विधी करावा लागेल, असे सांगितल्यामुळे तरुणाचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून भोंदू मांत्रिकाला अटक केले.

अंगात शिरलेले भूत काढून टाकण्याच्या बहाण्याने भोंदू मांत्रिकाकडून महिलांवर अत्याचार करणे, चमत्कार दाखविण्याच्या क्षमतेचा दावा करून लोकांची फसवणुकीचे अनेक प्रकार घडले आहेत. मात्र, त्यानंतरही अलौकिक शक्ती प्राप्त करण्यासाठी आयुष्य धोक्यात घालण्यास अनेकांकडून प्राधान्य दिले जात आहे. संपत्ती, पैसा मिळविण्यासाठी अमानुष कृत्यासह मानवी बलिदान देण्याचाही प्रयत्न केल्याचे दिसून आले आहे. मांत्रिक किंवा एखाद्याकडे अलौकिक शक्ती आहे असे भासवून त्यांना आज्ञा पाळण्यास भाग पाडले जात आहे. दिवसेंदिवस अशा घटना वाढीस लागल्यामुळे आधुनिकतेकडे चाललेल्या समाजाची मोहमाया संपणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा ऑगस्ट 2013 मध्ये लागू करण्यात आला आहे. त्यामुळे कायद्याचे उल्लंघन केल्यास कमीतकमी सहा महिने शिक्षा आणि जास्तीत जास्त सात वर्षांची शिक्षा ठोठावली जाउ शकते. त्यामध्ये 5 ते 50 हजारांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

नागरिकांकडून कमी वेळेत जास्तीत जास्त पैसा मिळविणे, कौटुंबिक अडचणी दूर करणे, भूत-प्रेतसारख्या मांत्रिकाच्या भंपक गोष्टींना खतपाणी घातले जात आहे. त्यामुळे भोंदूगिरीचे पेव काही प्रमाणात वाढल्याचे दिसून आले ओह. पुण्यात मागील दीड वर्षांत जादूटोणा विरोधी कायद्यानुसार 5 गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, लोभापायी जादूटोणा, मांत्रिक, भोंदूबाबाच्या जाळ्यात अडकण्यापासून नागरिकांनी दूर राहणे महत्वाचे आहे.
– श्रीनिवास घाडगे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा

काळ्या बाहुल्या आणि अंधश्रद्धा

गावोगावी अंधश्रद्धेचा मोठा पगडा समाजावर आजही कायम आहे. विशेषतः अंगारे-धुपारे, धागे, दोरे, काळ्या बाहुल्यांची जादू अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवित आहे. त्यामुळे अंधश्रद्धा व जादूटोणा विरोधी कायदा होउनही अमंलबजावणी केली जात नाही. त्यासाठी कठोर उपाययोजना आवश्यक आहे. मात्र, मनातील भीती दूर करण्यासाठी ठिकठिकाणी ठोस जनजागृतीचे कार्यक्रम होणे गरजेचे आहे. त्याशिवाय भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्यांना धडा शिकविण्यासाठी तरूण पिढीनेही पुढाकार घेणे महत्वाचे आहे. अन्यथा वर्षानुवर्षे सुरू असलेला जादूटोणाचा भुलभुलैय्या कायम राहिल्यास आश्चर्य वाटायला नको.

आपली प्रतिक्रिया द्या