
कॅम्पमधील ‘फॅशन स्ट्रीट’ मार्केटला शुक्रवारी रात्री लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. आग अटोक्यात आल्यानंतर दुचाकीवरून घरी परतताना कॅण्टोन्मेंट बोर्डाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख प्रकाश हासबे यांचा अपघाती मृत्यू झाला. येरवडा परिसरात दुचाकीस्वार हसबे यांना सकाळी साडेसहाच्या सुमारास पीएमपीएल बसने धडक दिली. कर्तव्य बजावून परतणाऱया अधिकाऱयावर काळाने घाला घातला. यामुळे नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
फॅशन स्ट्रिट परिसरात शुक्रवारी रात्री 10.50 च्या सुमारास आग लागून शेकडो स्टॉल जळाले. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. मध्यरात्री आग आटोक्यात आली. परंतु कुलिंगचे काम सुरू असल्याने पहाटेपर्यंत कॅण्टोन्मेंट अग्निशमन दलाचे प्रमुख प्रकाश हसबे (वय 56) आणि जवान फॅशन स्ट्रीट परिसरात होते.
पहाटे सहाच्या सुमारास हसबे आणि जवान अग्निशमन केंद्रात आले. त्यावेळी घरी जाऊन आंघोळ करून पुन्हा येतो, असे सांगून सकाळी सहाच्या सुमारास हसबे दुचाकीवरुन त्यांच्या घरी निघाले. मात्र, येरवडा भागातील नागपूर चाळ ओलांडल्यानंतर काही अंतरावर समोरून येणाऱया पीएमपीएल बसने दुचाकीस्वार हसबे यांना धडक दिली.
या अपघातात गंभीर जखमी झालेल्या हसबे यांचा दुर्देवी मृत्यू झाला. हसबे यांच्यामागे पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी, सून, नातू असा परिवार आहे. हसबे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील हिवरे गावचे रहिवासी असून, सध्या पुण्यातील लोहगावमध्ये वास्तव्यास होते.





























































