पुणे आयुक्त करणार वाहतूककोंडीचा स्टडी; अहवाल सादर करण्याचे आदेश

वाढत्या वाहतूककोंडीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे शहरातील प्रमुख ३२ रस्ते आणि २२ चौक या ठिकाणी वाहतूककोंडी का होते, याची कारणे शोधून याबाबतचा अहवाल सोमवार (दि. २२) पर्यंत सादर करण्याचे आदेश महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.

शहरातील रस्त्यांवरील खड्डे, पॅचवर्क, हातगाडी पथारी यांची अतिक्रमणे, पादचारी मार्गावरील अडथळे आणि अवैध बांधकाम, यामुळे वाहतुकीला अडथळा होतो. मात्र, यावर तात्पुरती कारवाई होते. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटलेला आहे. सध्या पुण्यात १० किलोमीटर अंतर कापण्यासाठी सरासरी ३३ मिनिटे लागतात. त्यामुळे जगात वाहतूककोंडीमध्ये पुण्याचा चौथा क्रमांक आहे.

जानेवारी महिन्यात पुण्यात जागतिक स्तरावरील सायकल स्पर्धा होणार असून, या स्पर्धेच्या मार्गावरील रस्त्यांचे डांबरीकरण व सुशोभीकरणासाठी १४५ कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. मात्र, त्यासोबतच शहरातील इतर रस्त्यांचीही स्थिती सुधारण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. आयुक्तांनी प्रमुख ३२ रस्ते आणि २२ चौकांमधील वाहतूककोंडीची कारणे शोधण्याचे आदेश पथ विभाग, बांधकाम विभाग, अतिक्रमण विभाग, क्षेत्रीय कार्यालयांसह विविध विभागांना दिले आहेत. या अहवालांचे संकलन करून पुढील बैठकीत चर्चा करून उपाययोजना ठरविण्यात येणार आहेत.

अतिक्रमणांवरील कारवाई तीव्र करा
महापालिका प्रशासनाकडून शहरातील अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मोहीम सुरू केली आहे. गुरुवारीदेखील भर पावसात औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय तसेच धनकवडी-सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयांतर्गत कात्रज परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. तर, ढोले-पाटील रस्ता, कोथरूड-बावधन, वारजे-कर्वेनगर, कोंढवा-येवलेवाडी व बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत दोन दिवसांत अतिक्रमणे व बांधकामे पाडण्यात आली. महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी नागरिकांच्या तक्रारींच्या अनुषंगाने अतिक्रमण व बांधकाम विभागाला कारवाई तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालय हद्दीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते खडकी रेल्वे स्टेशन (दुतर्फा), डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते भाऊ पाटील रस्ता हॅरिस ब्रीज इत्यादी ठिकाणी अनधिकृत व्यावसायिकांवर अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली.