दुचाकीस्वाराने ट्रकचालकाला लुटले

ट्रकला दुचाकी आडवी लावून दुचाकीस्वार चोरट्यांनी चालकाला रॉडच्या धाकाने लुटल्याची घटना 25 सप्टेंबरला रात्री एकच्या सुमारास मंतरवाडी रस्त्यावरील सीएनजी पेट्रोल पंपाजवळ घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी एकाला अटक केली असून, दोघेजण पसार झाले आहेत.

नितीन सुनिल चव्हाण (22, रा. वैदुवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राम मोहाळे (27) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. राम हे 25 सप्टेंबरला मंतरवाडी रोडने त्यांचा ट्रक घेऊन सोलापूर महामार्गाकडे निघाले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या तिघांनी त्यांच्या ट्रकसमोर दुचाकी आडवी लावली. त्यानंतर आरोपी केबिनमध्ये शिरले. त्यांनी रॉडचा धाक दाखवून राम यांच्याकडून पैसे मागितले आणि मोबाईल काढून घेतला. त्यांच्याकडील 5 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला. पोलीस उपनिरीक्षक अविनाश शिंदे तपास करीत आहेत.