आकर्षक परतावा देण्याच्या आमिष दाखवून नागरिकांकडून रक्कम स्वीकारत तब्बल 3 कोटी 60 लाखांची फसवणूक करणाऱ्या बाप-लेकांच्या टोळीला लोणी काळभोर पोलिसांनी गुजरातमधील कच्छ परिसरातून अटक केले. भरतकुमार चरणदास जोशी, दीपक जोशी आणि हिरेन जोशी (सर्व रा. भुज, कच्छ, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी ज्ञानेश्वर नारायण काळभोर यांनी तक्रार दिली आहे.
आरोपी जोशी यांनी फिर्यादी ज्ञानेश्वर यांच्यासह 11 जणांना आकर्षक परताना देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानुसार नागरिकांकडून आरटीजीएस आणि बँकेच्या खात्यावरून रक्कम घेतली होती. मात्र, कोणाताही परतावा न देता तब्बल 3 कोटी 60 लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत होता. संबंधित आरोपी गुजरातमधील कच्छमध्ये राहत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून जोशी बापलेकांना अटक केली. मागील नउ महिन्यांपासून आरोपी जोशी फरार झाले होते. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, एसीपी कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, नितीन गायकवाड, गणेश सातपुते, श्रीनाथ जाधव, अजिंक्य जोजारे यांच्या पथकाने केली आहे.
”फसवणूकप्रकरणी तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आणखी फसवणूक झालेल्या नागरिकांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात संपर्क करावा.” – राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, लोणी काळभोर





























































