
पैशासाठी दोघा तरुणांचे फिल्मीस्टाईल अपहरण करुन तरुणाच्या डोक्यात बिअरची बाटली फोडत त्याला मारहाण करणाऱ्या आरोपींना सिंहगड पोलिसांनी तातडीने जेरबंद करुन दोन्ही तरुणांची सुखरुप सुटका केली. अपहरणकर्त्यांकडून 10 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या एका सीआरपीएफच्या जवानाचाही यामध्ये समावेश आहे. अविनाश पांडुरंग पाटील (वय 31 ) आणि उत्तम तुरंबेकर ( वय 31 दोघेही रा.गडहिंग्लच, कोल्हापूर) यांना अटक केली. आरोपींनी प्रभात तुकाराम तोडकर आणि अजित राऊत(कोल्हापूर) यांचे अपहरण केले होते. याप्रकरणी निखिल उदय गुरव (वय 26 ) यांनी फिर्यादी दिली आहे. उत्तम तुरंबेकर हा झारखंड येथे सीआरपीएफमध्ये कार्यरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखील व प्रभात रुमपार्टनर आहेत. तर अविनाश पाटील गावाजवळ रहाणारा असल्याने त्यांच्या ओळखीचा आहे. सोमवरी सायंकाळी निखील रुम बंद करुन रोडवर आला असता प्रभातला अविनाश आणि उत्तम मारहाण करीत होते. शेजारीच अजित राऊत हा देखील उभा होता. त्याला निखीलने विचारणा केली असता, ‘तु आमचेमध्ये पडु नकोस, तुझा काही संबंध नाही’, असे म्हणुन अविनाशने त्याला ढकलुन दिले. त्यानंतर आरोपीनी प्रभात आणि अजित यांना जबरदस्तीने स्कुटरवर बसवून नऱ्हेच्या दिशेने नेले. यानंतर थोड्याच वेळात प्रभातचा निखीलला फोन आला की त्याच्या डोक्यात बिअरची बाटली मारुन जखमी केले आहे. संदीपला फोन करुन पैसे द्यायला सांग नाही तर हे लोक मला जीवंत सोडणार नाहीत. यामुळे निखील आणि संदीप यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदाव घेवारे, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पी.बी.कणसे, उपनिरीक्षक नितीन जाधव, कुलदिप संकपाळ, ए.बी.काळे व त्यांचे पथकाने खाजगी वाहनाने भुमकर ब्रिज जवळील एका हॉटेल समोर जात सापळा रचून त्यांना पकडले. त्यानंतर अपहरण करण्यात आलेल्या दोघांची सुटकाही करण्यात आली.



























































