धायरी, बिबवेवाडीत घरफोडी; साडेसहा लाखांचा ऐवज लंपास

पुणे शहरातील धायरी आणि बिबवेवाडी परिसरात चोरट्यांनी दोन घरफोडीमध्ये साडेसहा लाखांचा ऐवज चोरून नेला आहे. या प्रकरणी सिंहगड रोड व बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

चोरट्यांनी धायरीतील गारमळा परिसरात राहणाऱ्या मिठुलाल बैरागी (वय – 55) यांच्या बंद फ्लॅटमध्ये 1 लाख 10 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैरागी कामाच्या निमित्ताने 22 फेब्रुवारीला बाहेरगावी गेले होते. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप उचकटून कपाटातील रोख व सोन्याचे दागिनेचे असा 1 लाख 10 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस अधिक तपास करत आहेत.

दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी सुखसागरनगरमधील केटरिंगच्या कार्यालयाचे कुलूप तोडून केटरिंगचे साहित्य व रोकड असा 5 लाख 60 हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी कमलेश परदेशी (वय – 30, रा. बिबवेवाडी) यांनी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. सुखसागरनगरमधील खेडेकर फ्लॉवर मिलजवळ कमलेश यांचे केटरिंगचे कार्यालय आहे. चोरट्यांनी कार्यालयातून वाढप्याचे कपडे, रोख रक्कम व इतर साहित्य चोरून नेले आहेत. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

घरकाम करणाऱ्या महिलेने दागिने चोरले

माणिकबाग परिसरात घरकाम करणाऱ्या महिलेने मालकाची नजर चुकवून 2 लाख 15 हजार रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. याप्रकरणी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 13 ते 28 फेब्रुवारी दरम्यान घडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या