चोरी करण्यासाठी टोळके कोणती शक्कल लढवतील याचा काही नेम नाही. घरफोड्या करण्यासाठी लागणारे कष्ट टाळण्यासाठी पाचजणांनी टोळीने अनोखी शक्कल लढवित ग्रामीण भागातून शेकडो बकऱ्यांची चोरी केली. त्यासाठी टोळक्याने पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नगरसह राज्यातील विविध भागातून तब्बल 36 वाहनांची चोरी केली. सराईत टोळीप्रमुखाला खडकी पोलिसांनी अटक करून 36 वाहन चोरीसह 4 बकऱ्या चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून 28 लाख 36 हजारांची वाहने जप्त करण्यात आली आहेत.
अॅलेक्स लॉरेन्स ग्रॅम्स (वय 22) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या साथीदारांचा शोध सुरू आहे. अॅलेक्स हा पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात बीसीएच्या द्वितीय वर्गात शिक्षण घेत आहे. त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाले आहे. 2018 पासून त्याने चोरी करण्यास सुरूवात केली होती. आतापर्यंत त्याने इतर साथीदारांच्या मदतीने तब्बल 50 पेक्षा जास्त गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला खडकी पोलिसांनी 29 ऑक्टोबरला अटक केली होती. त्यातील अॅलेक्स अंधाराचा फायदा घेउन पळून गेला होता. 16 डिसेंबरला त्याला पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने वाहनचोरीसह बकऱ्या चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण, पोलीस निरीक्षक शफिल पठाण, तपास पथकाचे प्रमुख प्रताप गिरी, हनुमंतराव जाधव, गणेश काळे, गणेश लोखंडे, राजकिरण पवार, अनिरूद्ध सोनवणे, भगवान हंबरडे, स्वप्निल घोलप, जहांगिर पठाण, विशाल शेवाळे यांच्या पथकाने केली.
अशी करीत होते चौरी
पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, नगर, सोलापूरमधून मुख्य आरोपी अॅलेक्स आणि त्याचे साथीदार दुचाकी चोरून नेत होते. त्यानंतर त्याच दुचाकीचा वापर करून तीन चाकी आणि मोटार गाडी चोरत होते. चोरलेल्या मोटारीत रस्त्यावरून जाणाऱ्या बकऱ्या चोरून बाजारात विक्री करीत होते. प्रत्येक बकऱ्याची विक्री केल्यानंतर आरोपींना 5 ते 15 हजार रूपये मिळत होते. मागील दोन वर्षांपासून आरोपींनी शेकडो बकऱ्यांची चोरी करून विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
मोठ्या गाडीतून बकऱ्यांची चोरी
रस्त्यावरून जाणाऱ्या बकऱ्या चोरून मोटारीत टाकल्या जात होत्या. त्यासाठी आरोपींकडून मोठ्या गाडीची चोरी केली जात होती. बकऱ्यांची विक्री केल्यानंतर आरोपी चोरी केलेल्या गाड्या निर्जनस्थळी सोडून वाहनांचे नुकसान करीत होते. खडकी पोलिसांच्या तपास पथकाने चाणक्षरित्या तपास करून आरोपीला अटक केली आहे.



























































