
दहशत निर्माण करण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या रिक्षाचालकाला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतूसे असा 40 हजार 400 रुपयांचा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. विनोद वामन आल्हाट ( वय 37, रा . दांडेकर पुल , दत्तवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
दत्तवाडी पोलीस हद्दीत गस्त घालत असताना नवी पेठेतील राजेंद्रनगरमध्ये एकजण पिस्तूल घेउन थांबला असल्याची माहिती पोलीस हवालदार कुंदन शिंदे, अमित सुर्वे व अक्षयकुमार वाबळे यांना मिळाली. आरोपी काहीतरी गंभीर अपराध करण्याची शक्यता असल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक स्वप्नील लोहार आणि पथकाने विनोद आल्हाट याला ताब्यात घेतले. अंगझडीत त्याचेकडे एक देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे सापडली. चौकशीत त्याने रिक्षाचालक असल्याची कबुली दिली असून उदरनिर्वाहाकरिता रिक्षा चालवितो असे सांगितले. दहशत निर्माण करण्याकरिता त्याने पिस्तूल बाळगल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ही कारवाई वरीष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर, पोलीस निरिक्षक विजय खोमणे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, हवालदार कुंदन शिंदे , सुधीर घोटकुले , अमित सुर्वे, महेश गाढवे , राहुल ओलेकर , शिवाजी क्षीरसागर, अक्षयकुमार वाबळे, नवनाथ भोसले , सागर सुतकर, प्रमोद भोसले , शरद राऊत, विष्णु सुतार यांनी केली.




























































