
पूर्ववैमनस्यातून तरूणावर कोयत्याने वार करून खून करणाऱ्या चौघांच्या टोळीला हडपसर पोलिसांनी 12 तासांमध्ये अटक केले.
शुभम संजय मोडक (वय 20), बंटी तानाजी तुपे (वय 23) , प्रतीक अशोक तांबेकर (वय 21) , प्रकाश बाळू कांबळे (वय 23 ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. अनिकेत शिवाजी घायतडक (19, रा. माळवाडी, हडपसर) असे खून झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोडक आणि घायतडक यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री घायतडक साडेबाराच्या सुमारास मोडककडून पैसे आणण्यासाठी गेले होता. त्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाले. त्याचा राग आल्यामुळे मोडक आणि साथीदारांनी घायतडकला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याने वार करून खून केला होता. खूनप्रकरणातील आरोपी कवडीपाट टोलनाक्यावर असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने, विनोद शिवले, समीर पांडुळे, अकबर शेख, शाहिद शेख आणि प्रशांत टोणपे यांना मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी घायडतकचा खून केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक राजू अडागळे, प्रदीप सोनवणे, विनोद शिवले, समीर पांडुळे, संदीप राठोड, शशिकांत नाळे, शाहिद शेख, प्रशांत टोणपे, सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, उमाकांत स्वामी यांच्या पथकाने केली.

























































