एकतर्फी प्रेमातून तरुणीचा विनयभंग, धमकी देत पैसेही उकळले; पुण्यातून तरूणाला अटक

प्रातिनिधिक फोटो

एकतर्फी प्रेमातून तरूणीला लग्नासाठी मागणी घालून त्रास दिल्याप्रकरणी तरूणाला अटक करण्यात आली आहे. आरोपीने तरूणीच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत पैसे उकळल्याचेही उघडकीस आले आहे. कुतुबुद्दीन हबीब काचवाला (वय – 23, रा. कसबा पेठ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत 21 वर्षीय तरुणीने मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना जून 2016 ते मे 2021 दरम्यान घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी काचवाला व तरूणी 2016 मध्ये एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. त्यामुळे त्यांची ओळख होती. त्यावेळी काचवाला हा तरूणीचा सतत पाठलाग करत असताना तरूणीने त्याच्यासोबत संबंध ठेऊन शकत नसल्याचे सांगितले होते. तरीही त्याने तिचा पाठलाग सुरूच ठेवला.

भविष्यात तुला माझ्यासोबतच लग्न करावे लागेल, दुसऱ्या सोबत लग्न केल्यास तुझ्या आई-वडिलांना जीवे मारेल अशी धमकी दिली. तरुणीकडे वेळोवेळी पैशाची मागणी करीत 40 हजार रूपये आणि एक तोळ्याची अंगठी घेतली. तिच्या मागे लागून अश्लिल बोलून तिचा विनयभंग केला. तिची बदनामी करण्याची धमकी दिली.

अखेर या त्रासाला कंटाळून तरुणीने हा सर्व प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या