तलवारीने केक कापणे महागात पडले, सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’

बाई, बाटली आणि पैसा हे प्रत्येक गुन्ह्यामागचे प्रमुख कारण! मात्र, काळाच्या ओघात हे चित्र पूर्ण पालटले आहे. व्हॉट्सअॅ प, चेंटिंग, स्टेटस, इन्स्टाग्रामवरील पोस्टमुळे गुन्हेगारी वाढत आहे. वादावादी, भांडण, हाणामाऱ्याच नव्हे, तर थेट खुनापर्यंत होणाऱ्या या गुन्ह्यांमुळे पोलीससुद्धा वैतागले आहेत. सोशल मीडियावरील ‘भाईगिरी’ आता पोलिसांना डोकेदुखी बनली आहे.

सर्व सामान्यांबरोबरच गुन्हेगारांमध्येही व्हॉट्सअॅपचा वापर वाढला आहे. भररस्त्यात तलवारीने केक कापणे हा त्यापैकीच एक प्रकार ! तलवारी, पिस्तुलाचे स्टेटस – ठेवले जाते. हातात पिस्तूल घेतलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी (२७ ऑगस्ट) जुनी सांगवीतील औंध जिल्हा आयुष रुग्णालयाजवळ घडली.

ओम ऊर्फ नन्या विनायक गायकवाड (वय २१, रा. जुनी सांगवी) याला अटक करण्यात आली आहे. आशीष वाघमारे (रा. नवी सांगवी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा भाईंविरुद्ध पोलिसांची धडक मोहीम सुरूच असते. मात्र, तरीही हे प्रमाण कमी होत नाही.

एके काळी शांत शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या पुण्यात गेल्या काही वर्षांत गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी एखादा खून झाला तरी सर्वत्र घबराट पसरत असे. चाकू, सुरे, तलवार ही गुन्हेगारांची मुख्य शस्त्रे टोळीयुद्धाचा भडकाही पुण्याने काही वर्षांपूर्वी पाहिला. त्यामध्येही तलवारी, चाकूचा वापर होत होता.

कालांतराने पुण्यात ‘घोड्या’चा वापर सुरू झाला. गावठी कट्ट्यांपासून परदेशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरमधील गोळ्यांचा आवाज सर्वत्र घुमू लागला. शांत पुण्यातील रस्त्यावर रक्ताचे सडे पडू लागले. ते रोखण्यास पोलिसांना काही प्रमाणात यश आले. मात्र, आता सोशल मीडियामुळे गुन्ह्यांचे स्वरूपही बदलले.

वेगवेगळ्या बतावणीने ऑनलाइन गंडा घालण्याचे गुन्हे वाढले. सायबर सेलकडे अशा गुन्ह्यांच्या तक्रारींचा अक्षरशः पाऊस पडू लागला. लोकसंख्येच्या तुलनेत अपुरी संख्या असूनही पोलीस त्याला आळा घालण्याचा प्रयत्न करीत आहेत.

या गुन्ह्यांच्या तपासात व्यग्र असलेल्या पोलिसांपुढे आता सोशल मीडियामुळे होणाऱ्या गुन्ह्यांची डोकेदुखी निर्माण झाली. सोशल मीडियाबरोबरच सायबर क्राइमचे प्रमाणही वाढले. ऑनलाइन फ्रॉड, नायजेरियन फ्रॉड, मेट्रोमॉनी साइट आणि अन्य अनेक गुन्हे साधारणतः रोजच घडतात.