
किरकोळ वादातून दारूच्या नशेत असलेल्या मित्राने तीक्ष्ण शस्त्राने वार करून मित्राचा खून केल्याची घटना 12 डिसेंबरला बोपदेव घाटात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
धनंजय हरिदास गायकवाड (वय – 23, रा. कोंढवा बुद्रुक) असे खून झालेल्याचे नाव आहे. किरण भागवत थोरात (वय – 26, रा. राजीव गांधी नगर, बिबवेवाडी) याला अटक केली आहे. धनंजयचे वडील हरिदास यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजय आणि किरण मित्र असून दोघेही फर्निचर दुरुस्तीचा व्यवसाय करतात. काही दिवसांपूर्वी हॉटेलचे बिल देण्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर 12 डिसेंबरला ते दोघेही बोपदेव घाटात दारु पिण्यासाठी गेले होते. दारु पित असताना त्यांच्यामध्ये वाद झाला. वादातून किरणने धनंजयवर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खून केला. पसार झालेल्या किरणला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक हरिष शिळमकर तपास करत आहेत.






























































