कुख्यात गजा मारणेला दिली बिर्याणी; पाच पोलीस निलंबित

मोक्कानुसार कारवाई केलेल्या कुख्यात गुंड गजानन ऊर्फ महाराज मारणे याला येरवडा ते सांगली कारागृहात वर्ग करताना मटण बिर्याणी खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्या सोबतच प्रवासादरम्यान मारणेच्या टोळीतील 80 ते 100 जणांनी आलिशान मोटारींतून पुणे ते सांगली असा पोलीस व्हॅनचा पाठलाग केला. त्याला कारागृहात दाखल करण्यासाठी तैनात असलेल्या पुणे गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक आणि चार पोलीस अंमलदारांनी मारणेला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली. एका ढाब्यावर मारणे टोळीतील साथीदारांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये मटण बिर्याणी खाऊ घातल्याचा धक्कादायक प्रकार 3 मार्च रोजी घडला आहे. याप्रकरणी संबंधित एपीआयसह पाच अंमलदारांना निलंबित केले. त्यासोबत तिघा सराईतांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.