पुण्यात फुकट पाणीपुरी न दिल्याने विक्रेत्याला बेदम मारहाण, तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाणीपुरीचे पैसे मागितल्याचा राग आल्यामुळे पाणीपुरी विक्रेत्याला बेदम मारहाण करुन गाडीची तोडफोड करीत रोकड लुटणाऱ्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली. ही घटना 13 ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास उरळी कांचन परिसरात घडली.

वैभव राजाभाऊ तरंगे (वय – 19, रा. दत्तवाडी, उरूळी कांचन), तुषार अनिल अडागळे (वय – 18), प्रताप बाळू लोंढे (वय – 21, दोघे रा. गोळेवस्ती, उरूळी कांचन) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पाणीपुरी विक्रेता अनिल राठोड (वय – 32, रा. ऊरळी कांचन) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

उरळी कांचनमधील दत्तवाडी भागात राठोड पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. आरोपी वैभव, तुषार, प्रताप यांनी 13 ऑगस्टला राठोड यांच्याकडे पाणीपुरी खाल्ली. त्यांच्याकडे पैशांची मागणी केली असता, आरोपींनी आम्हाला ओळखत नाही का? आम्ही परिसरातील भाई आहोत, असे म्हणून राठोड यांना बांबूने बेदम मारहाण केली. तसेच पाणीपुरी गाडीची तोडफोड करुन दहशत माजविली.

मारहाणीनंतर गल्ल्यातील दीड हजारांची रोकड लुटून आरोपी पसार झाले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके तपास करीत आहेत.