
बेकायदा देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या सराईत गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तुल, दोन जिवंत काडतुसे असा 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अक्षय दिलीप रावडे (वय 26, रा. माळेवाडी, किरकटवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
खंडणी विरोधी पथकातील पोलिस अधिकारी व कर्मचारी गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास नऱ्हे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी एक तरुण पिस्तुल जवळ बाळगुन नऱ्हे परिसरातील पारी चौकाजवळ फिरत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी राजेंद्र लांडगे व प्रफुल्ल चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने नऱ्हे येथील पारी चौकात सापळा रचला. त्यावेळी पुजा मार्केट दुकानासमोर एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तुल व त्यातील मॅगझिनमध्ये दोन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी त्यास अटक केली. आरोपी रावडे याच्याविरुद्ध यापुर्वीही बेकायदा शस्त्र बाळगणे यासह अन्य गुन्हे दाखल आहेत.


























































