पोलीस हवालदारावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

सोसायटीलगत असलेल्या मैदानात रात्रीच्यावेळी मद्यपान करणाऱ्या दोघांना बीट मार्शलांनी पोलीस ठाण्यात घेउन जाण्याचा प्रयत्न केल्याचा राग आल्यामुळे एकाने पोलिस हवालदारावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. तर दुसऱ्या आरोपीने हवालदाराला मारहाण केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपुर्वी एरंडवण्यातील गणेशनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी दोघांना अलंकार पोलिसांनी अटक केले आहे.

मंदार मनोहर गरूड (वय 31, रा. बिबवेवाडी) आणि शिवम प्रसाद मारणे (वय 30, रा. एरंडवणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अनंत ढवळे यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढवळे अलंकार पोलीस ठाण्यात हवालदार आहेत. दोन दिवसांपुर्वी रात्रपाळीला असताना त्यांना पोलीस मुख्यालयातून कॉल आला. त्यामुळे ढवळे आणि सुतार एरंडवण्यातील गणेशनगरमध्ये गेले. त्यावेळी मंदार आणि शिवम मोकळ्या मैदानात मद्यपान करीत होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्यात घेउन जाण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग आल्यामुळे मंदारने ढवळे यांच्यावर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी वार चुकविला. तर दुसऱ्या आरोपी शिवमने सुतार यांना हाताने मारहाण केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संगिता पाटील तपास करीत आहेत.