पुणे – घरफोडीनंतर थाटला संसार, तब्बल सात वर्षांनी आला पोलिसांच्या नजरेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरफोडी केल्यानंतर सराईत चोरट्याने गावाकडे जाउन लग्न करीत संसार थाटला. त्यानंतर तब्बल सात वर्षांनंतर भावाला लातूरहून पुण्यात भेटण्यासाठी आल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या युनीट एकला लागली. त्यानुसार सापळा रचून फरारी सराईताला अटक करण्यात आली. गणेश भाउराव कांबळे (वय 31, रा. अपर इंदिरानगर, मूळ-भालगाव, बार्शी, सोलापूर) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

गुन्हे शाखेच्या युनीट एकमधील अधिकारी कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी कोथरूरमध्ये सात वर्षांपुर्वी घरफोडी करणारा सराईत चोरटा भावला भेटण्यासाठी व्हीआयटी हॉस्टेल चौकात आल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून गणेश कांबळे याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ, बिबवेवाडी, सहकारनगर, कोथरूड, लोणी काळभोर पोलीस ठाण्यातंर्गत घरफोडी आणि दरोड्याच्या तयारीचे 10 गुन्हे दाखल आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवासा घाडगे, एसीपी सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सुनील कुलकर्णी, इम्रान शेख, सतीश भालेकर, तुषार माळवदकर यांनी केली.