पुण्यात चोरी करताना ओरडल्यामुळेच केला पोलिस अधिकाऱ्याच्या आईचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

घरामध्ये चोरी करत असताना जेष्ठ महिला ओरडल्यामुळे पकडले जाउ शकतो, त्यामुळेच महिलेच्या डोक्यात रॉड मारून खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. त्यानंतर ट्रॅव्हल्सने मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखा युनीट तीनने आरोपीला अटक केली आहे. अफसर अस्लम अली (वय 19, रा. रामनगर, मूळ-जोनपूर, उत्तरप्रदेश ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शहाबाई अरुण शेलार (वय 65, रा. रामनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

वारजे-माळवाडी परिसरातील रामनगर भाजी मंडईजवळ पत्र्याच्या शेडमध्ये पोलीस अधिकाऱ्याच्या आईचा शनिवारी पहाटे चारच्या सुमारास खून करण्यात आला होता. त्यानुसार दरोडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखेकडून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला जात होता. दरम्यान, जेष्ठ महिलेच्या घरात चोरी केल्यानंतर तिचा खून करून मूळगावी जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीची माहिती पोलीस हवालदार राजेंद्र मारणे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या पथकाने संगमवाडीतील टॅव्हल्स पार्किंगकडे धाव घेतली.

त्यानुसार पथकाने संशयित अफसरला अली याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने घरामध्ये चोरी करताना शहाबाई ओरडत होत्या. त्यामुळे आपण पकडले जाउ शकतो, याची भीती निर्माण झाल्यामुळे महिलेच्या डोक्यात रॉड मारून खून केल्याची कबुली त्याने दिली. अवघ्या काही तासांमध्ये आरोपीला अटक केल्यामुळे गुन्हे शाखा युनीट तीनचे कौतुक केले जात आहे. ही कामगिरी पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रनाथ देशमुख, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शेवाळे, सहायक पोलीस निरीक्षक जुबेर मुजावर, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय काळे, राजेंद्र मारणे, संतोष क्षीरसागर, एकनाथ कंधारे, महेश निंबाळकर, हनुमंत गायकवाड, रामदास गोणते, दीपक क्षीरसागर, विल्सन डिसोझा, सुजीत पवार, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे, गणेश पाटोळे, ऋषीकेश कोळप, अतुल मेंगे, मॅगी जाधव यांच्या पथकाने केली.