
नवनाथ शिंदे । पुणे
राज्यभरात कोरोना व्हारयसने धुमाकूळ घातला असून दिवसेंदिवस नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनापासून दूर राहण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विशेषतः सोशल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यानुसार नागरिकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. दुसरीकडे मात्र, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तैनात करण्यात आलेल्या एसआरपीएफ ग्रुपला प्रचंड मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. प्रवास करताना एसआरपीएफ ग्रुप दोनच्या जवानांना सोशल डिसटन्सींग न पाळता एकाच गाडीतून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित जवानांना कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. शिवाय त्यांना रात्रीच्या झोपण्यासाठी पुरेशा निवार्याची सोय करण्यात आली नसल्याचा आरोप जवानांनी केला आहे.
कोरोनामुळे पुणे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यापार्श्वभुमीवर सुरक्षिततेसाठी पोलिसांनी एसआरपीएफ ग्रुपला पाचारण केले आहे. मात्र, संबंधित 76 जवानांना एकाच गाडीतून टप्याटप्याने 25 ते 30 जवानांना एकाच गाडीतून प्रवास करावा लागत आहे. परिणामी अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एसरआरपीएफ ग्रुप दोनच्या कंपनीतील जवानांना शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयात झोपण्यासाठी पार्किंगमध्ये सोय करण्यात आली आहे. मात्र, त्याठिकाणी जवानांना रात्री डासांना सामोरे जावे लागत आहे. मुख्यालय ते इतर ठिकाणी प्रवास करताना एकाच गाडीत कोंडले जात आहे. तर रात्री झोपतानाही जवानांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोरोनाच्या विळख्यात एसआरपीएफ ग्रुप दोनचे अधिकारी जवानांना पुरेशी साधनसामग्री उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप केला आहे. एकंदरीत कोरोनाच्या महामारीत पुणे पोलीस आणि एसआरपीएफचे अधिकारी जवानांच्या सुरक्षिततेसाठी काय भूमिका घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसआरपीएफ ग्रुप दोनच्या 74 जवानांची तुकडी पुणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आली आहे. 6 एप्रिलपासून तुकडी रिझर्व्ह ठेवली आहे. दरम्यान, एसआरपीएफ मुख्यालय ते शिवाजीनगर पोलीस मुख्यालयापर्यंत पहिल्या दिवशी जवानांची टीम एका गाडीतून वाहतूक केली होती. सोशल डिसटन्ससाठी उद्यापासून जवानांच्या वाहतुकीसाठी अतिरिक्त तीन वाहनांची सोय केली आहे. तसेच जवानांना झोपण्यासाठी चांगली सोय करण्यासाठी पत्रव्यवहार केला आहे. -बी वाय पवार, पोलीस निरीक्षक, एसआरपीएफ ग्रुप दोन, वानवडी





























































