
तुमच्या बीएसएनएल सीमकार्डची मुदत संपली असून चोवीस तासांत ते बंद पडणार आहे. सीमकार्ड सुरूच ठेवायचे असल्यास दिलेल्या क्रमांकावर फोन करा. सध्या ऑनलाईन अॅक्टीव्हेशन बंद असून ऑफलाईन करावे लागेल, असे सांगून सायबर चोरट्याने जेष्ठ महिलेच्या बँकखात्याची माहिती घेऊन तब्बल 10 लाख 85 हजारांचा ऑनलाईन गंडा घातला. ही घटना फेब्रुवारीमध्ये वानवडीत घडली आहे. या प्रकरणी 57 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी महिला कुटूंबियासह वानवडी परिसरात राहायला आहे. ४ फेब्रुवारीला त्यांना एकाने व्हॉटसअॅपवर बीएसएनएल कंपनीचा लोगो पाठविला. मी बीएसएनएल कार्यालयाचा माजी कर्मचारी असून कोथरूडमधून बोलत असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर सायबर चोरट्याने महिलेला तुमचे सीमकार्ड बंद पडणार आहे. सीमकार्ड सुरूच ठेवायचे असल्यास दिलेल्या क्रमांकावर फोन करा. सध्या ऑनलाईन अॅक्टीव्हेशन बंद असून ऑफलाईन करावे लागेल, असे सांगून सायबर चोरट्याने जेष्ठ महिलेच्या बँकखात्याची माहिती घेतली.
त्यानंतर एटीएम कार्डचा सीव्हीसी क्रमांक घेऊन 75 हजार रूपये काढले. त्यानंतर 10 लाख 10 हजारांचे ऑनलाईन ट्रान्झेक्शन करून महिलेला एकून 10 लाख 85 हजारांचा ऑनलाइन गंडा घातला. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड तपास करीत आहेत.






























































