दहीहंडीत डीजेचा दणदणाट; पुण्यात 116 मंडळांवर खटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डीजेच्या आवाजाला पुणेकरांचा विरोध असतानाही दहीहंडीत उपनगरांसह शहरात अनेक मंडळांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे ध्वनिप्रदूषणाच्या नियमांना केराची टोपली दाखविणाऱया मंडळांवर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पातळी ओलांडणाऱ्या 116 मंडळांवर खटला भरला असून, बेशिस्त डीजेचा चार प्लाझ्मा, चार प्रेशरमीडसह सहा ध्वनियंत्रणा जप्त केल्या आहेत.

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी शहरातील तब्बल 1 हजार 100 मंडळांच्या ध्वनीचे ‘रीडिंग’ घेतले होते. डीजेवादन सुरू असताना ध्वनीची तीव्रता किती होती याची नोंद करण्यात आली. या नोंदीचे परीक्षण करून निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केलेल्या संबंधित मंडळांवर गुन्हे दाखल करण्यासह कायदेशीर कारवाई केली आहे. ध्वनीच्या ‘रीडिंग’चे परीक्षण करून नियमभंग करणाऱ्या मंडळांची छाननी करण्यात आली. त्यानंतर हा कारवाईचा बडगा उचलण्यात आला.

पिंपरीत 16 मंडळांवर गुन्हे

पिंपरी-चिंचवडमधील 16 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांचे 16 डॉल्बी स्पीकर, ऑम्प्लिफायर, मिक्सर आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. निर्धारित ध्वनिमर्यादेचे उल्लंघन केल्यास यापुढेही कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस उपायुक्त धीरज पाटील यांनी दिला आहे.