सासूचे दागिने व पैसे घेऊन सून प्रियकराबरोबर पसार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तपनेश्वर गल्लीतील एक विवाहिता 22 तोळे सोने व तीस हजार रुपयाची रोकड घेऊन प्रियकराबरोबर फरार झाली आहे. याबाबत जामखेड पोलीसांत महिलेच्या पतीने पत्नी व तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे.

वैभव सुग्रीव वायकर यांचा विवाह 29 मे 2019 रोजी पल्लवी हिच्या बरोबर झाला होता. लग्नानंतर तो पत्नी आईवडिलांबरोबर जामखेड शहरात तपनेश्वर गल्लीत राहत होता. वैभव 16 जुलै रोजी सकाळी 11 वाजता कामानिमित्त बाहेर पडला होता. दुपारी एकच्या सुमारास त्याचे वडील सुग्रीव वायकर घरी आले असता घराचा दरवाजा उघडा असल्याचे व कपाटातील वस्तू अस्ताव्यस्त पसरल्याचे त्यांना दिसले . तसेच सून पल्लवीही घरात दिसत नसल्याने त्यांनी ताबडतोब वैभव यास मोबाईलवर फोन केला.

वैभव घरी आल्यावर त्यांनी शेजारी पाजारी तसेच नातेवाईक यांच्याकडे शोध घेतला. पण पत्नी पल्लवी कुठेही सापडली नाही . घरातील कपाट तपासले असता पल्लवी हिला लग्नात घातलेले सोन्याचे नेकलेस, गंठण, मनी मंगळसुत्र, कानातील फुल असे 10 तोळे दागिने व वैभवची आई मंदा हिचे सोन्याचे विविध प्रकारचे 12 तोळे याची किंमत 5 लाख 80 हजार व रोख 30 हजार दिसून आले नाही. तसेच पत्नी माहेरी शिर्डी येथे गेली असेल म्हणून वैभवने सासरे पोपट मुरमुडे यांना फोन केला असता कल्पना तेथे नसल्याचे सांगितले. जामखेड येथे आल्यावर त्यांच्या समवेत जामखेड पोलीस स्टेशनला जाऊन दि. 16 रोजी मिसिंगची तक्रार दाखल केली.

पल्लवी हि शिर्डी येथील नासीर उर्फ अश्शु मुज्जीम शेख (रा. विठ्ठलनगर शिर्डी तालुका राहता) याच्याबरोबर घरातील 22 तोळे सोन्याचे दागिने व रोख 30 हजार चोरून नेले अशी फिर्याद मंगळवार 27 रोजी दाखल केली आहे. पोलिसांनी फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार करीत आहेत.