
चित्रपटात बॅक स्टेज कलाकार म्हणून काम करणाऱ्या 21 वर्षीय तरुणीला पार्टीच्या निमित्ताने बोलावून दिग्दर्शकाने तिच्यावर बलात्कार केला आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दाखल केली आहे.
अमित प्रेमचंद सिटलानी (वय40 ,रा.कळस,पुणे) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी तरूणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट असून अमित हा कास्टिंग दिग्दर्शक आहे. मित्राच्या ओळखीतून त्याची तरुणीशी ओळख झाली. मे 2017 मध्ये त्याने तरूणीला टिंगरेनगर येथे मित्राच्या फ्लॅटवर पार्टीसाठी नेले होते. तिथे तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्यावेळी त्याने व्हिडीओ रेकॉर्डिंग देखील केले. त्या व्हिडीओच्या आधारे बदनाम करण्याची धमकी देत त्याने वेळोवेळी अत्याचार केला. अनेकदा तो तिला शिवीगाळ करीत मारहाण देखील करायचा. या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. पीडित तरुणीवर अत्याचार झाला त्यावेळी पीडित अल्पवयीन होती. त्यामुळे याप्रकरणात पोस्कोचे कलम समाविष्ठ करण्यात आल्याचे पोलीस उपनिरीक्षक शुभांगी मगदुम यांनी सांगितले.

























































