ईडीचा माणूस आला अन परत गेला, खडसेंचे भोसरीतील विवादित भूखंड प्रकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
eknath-khadse

भोसरीतील विवादीत भुखंड प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना अंमलबजावणी संचनालयाने (ईडी) नोटीस बजावली होती. त्यानंतर पुराव्यांची जुळवा जुळव करण्यासाठी आणि खटल्यासंबंधी कागदपत्रे मिळविण्यासाठी संबंधित विभागाने पाठविलेले एक प्रतिनिधी अ‍ॅड. असिम सरोदे यांच्या कार्यालयात आले होते. मात्र, प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहून प्रतिनिधी नाराजी व्यक्त करत कागदपत्रे न घेताच बाहेर निघुन गेला.

अंजली दमानीया यांचे वकील अ‍ॅड. असीम सरोदे यांना ईडीने खडसेंच्या विरोधातील न्यायालयात दाखल असलेल्या प्रकरणाची कागदपत्रांची माहिती मागितली होती. त्यानुसार अ‍ॅड. सरोदे यांनी ईडीच्या मागणीला सहमती दर्शवत कागदपत्रे देण्याचे मान्य केले होते. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मागणी केल्यानुसार अ‍ॅड. सरोदे यांनी 1 हजार 340 पाने झेरॉक्स करून ठेवले होते. त्यानुसार आज दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास ईडीचा एक प्रतिनिधी अ‍ॅड. सरोदे यांच्या कार्यालयात आले होते. परंतु, संबंधिताने ईडीमध्ये काम करत नसल्याचे सांगत फक्त कागदपत्रे घेण्यासाठी आलो असल्याची माहिती त्यांना दिली. प्रसारमाध्यम प्रतिनिधींना पाहिल्यानंतर संबंधित प्रतिनिधी मोबाईलवर बोलत कागदपत्रे न घेताच बाहेर पडला.

भोसरी भूखंड प्रकरण

भोसरीतील 3.1 एकरचा भूखंड घोटाळ्या प्रकरणात तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून जमीनीचे फेरफार केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. पत्नी आणि त्यांचे जावई यांच्या नावावर वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून लाखो रूपये पाठविले. तसेच संबंधित कंपन्या मुख्यत्वे कोलकाता येथील असल्याचे सांगण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या कंपन्यांची अंजली दमानीया यांनी माहिती काढून चौकशी केली. त्याठिकाणी त्यांना कोणत्याही कंपन्या आढळल्या नाही. त्यामुळे बनावट कंपन्यांच्या आधारे हा व्यवहार झाल्याचे लक्षात आल्याुमळे त्यांनी एसीबीकडे तक्रार केली होती. याप्रकरणात एसीबीने क्लोजर रिपोर्ट न्यायालयात दाखल केला. परंतु, अंजली दमानीया यांच्या वतीने अ‍ॅड. असीम सरोदे यांनी हस्तक्षेप अर्ज दाखल करून विरोध दर्शविला होता. त्यावरील आदेश सध्या प्रलंबित आहे.