फुरसुंगीत कंपनीत सशस्त्र दरोडा, पिस्तुलाच्या धाकाने सव्वा लाख रूपये लुटले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फुरसुंगी परिसरातील एका कंपनीत चोरट्यांनी सशस्त्र दरोडा टाकून पिस्तुलाच्या धाकाने 1 लाख 27 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. मंगळवारी रात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष मल्हारी पवार (वय 25, रा. भोई आळी, फुरसुंगी ) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगीतील दिघे वस्ती परिसरात सोनारपुल येथे डेक्सटल लॉजिस्टीक कंपनी आहे. तेथे मंगळवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास आशिष आणि त्यांचे सहकारी पार्सल वेगवेगळे करण्याचे काम करत होते. त्यावेळी अचानक पाच जण तोंडाला रूमाल बांधून कंपनीत शिरले. त्यांनी पिस्तुलाचा आणि कोयत्याचा धाक दाखवून ओमकार यांच्याकडून कपाटाची चावी घेतली. त्यानंतर त्यांनी कपाटातील १ लाख २७ हजार ३३७ रूपयांची रोकड चोरी करून फरार झाले. याप्रकरणी हडपसर पोलिस तपास करत आहे.