
सरकार आणणं हे आपलं उद्दिष्ट आहे, कुणाला मुख्यमंत्री करणं नाही असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नितीन गडकरी हे शुक्रवारी पुणे दौऱयावर होते. कात्रज ते नवले ब्रिज यादरम्यानच्या सहापदरी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते झाले. या दौऱयात गडकरी यांनी पुण्यातील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांना बैठकीत मार्गदर्शन केले.
आपल्या खुमासदार शैलीत गडकरी यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना सध्या महाराष्ट्रात वेगाने घटना घडताहेत. काही लोकांना मुख्यमंत्रीपद हवे आहे पण सरकार स्थापन करणे हे आपले उद्दिष्ट आहे, कुणाला मुख्यमंत्री करणे हे आपले उद्दिष्ट नाही अशा शब्दांत स्पष्ट निर्वाळा दिल्याने गडकरी यांचा हा टोला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होता का, अशी चर्चा भाजपच्या वर्तुळात पुण्यात होती.

























































