
खुनाच्या गुन्ह्यातून येरवडा कारागृहातून निर्दोष सुटका झाल्यानंतर शहरात गँगची पूर्वीप्रमाणेच दहशत राहावी यासाठी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या गँगस्टर शरद मोहोळसह पाच जणांना अटक करण्यात आली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शरद हिरामण मोहोळ (वय 38), विश्वास बाजीराव मनेरे (वय 37), मनोज चंद्रकांत पवार (वय 42) स्वप्निल अरुण नाईक (वय 35) योगेश भालचंद्र (वय 40) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. अक्षय भालेराव, सिताराम खाडे, दिनेश भिलारे, मंगेश धुमाळ यांच्यासह दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत 26 जानेवारीला एका संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला गँगस्टर शरद मोहोळ आणि त्याचे दहा ते बारा साथीदार त्या ठिकाणी आले होते. कोरोनाच्या अनुषंगाने जमावबंदी आदेश असतानाही आरोपींनी बेकायदेशीर गर्दी जमवून आरडाओरडा करत गुरुवार पेठेत दहशत निर्माण केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


























































